आबासाहेब हे तर दुसरे लोकमान्य

By admin | Published: August 29, 2016 04:52 AM2016-08-29T04:52:30+5:302016-08-29T04:52:30+5:30

स्वातंत्र्याच्या लढ्याला सामाजिक अधिष्ठान देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती घराबाहेर आणला. गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली

Abasaheb is the second Lokmanya | आबासाहेब हे तर दुसरे लोकमान्य

आबासाहेब हे तर दुसरे लोकमान्य

Next

डोंबिवली : स्वातंत्र्याच्या लढ्याला सामाजिक अधिष्ठान देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती घराबाहेर आणला. गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. त्याच धर्तीवर संस्कृतीची जपणूक करत ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डोंबिवलीतील आबासाहेब पटवारी यांनी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा सुरू केली. ती सातासमुद्रापार पोहोचली. त्यामुळे आबासाहेबांचे कार्य हे लोकमान्यांच्या तोडीचे आहे, असे गौरवोद्गार उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी काढले.
सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात श्रीपाद वामन ऊर्फ आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. तेव्हा ते बोलत होते. या वेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापकीय सदस्य डॉ. अशोक कुकडे, ‘विवेक प्रकाशना’चे मुख्य व्यवस्थापक दिलीप करंबळेकर आणि अमोल पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खेड्यातून आलेला सामान्य कार्यकर्ताही मोठे काम उभारू शकतो. त्याचा समाजाला उपयोग होऊ शकतो. तसे काम आबासाहेबांनी केले आहे. सामान्य दिसणारे आबासाहेब हे सामान्यातील असामान्य आहेत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडले. त्यामुळे त्यांना लिहिते करणाऱ्याचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी हे पुस्तक लिहिले नसते, तर त्यांच्या आयुष्यात भेटलेली विविध क्षेत्रांतील माणसे आपल्यासमोर आलीच नसती. त्यांच्या पुस्तकाला दोघांची प्रस्तावना लिहिली आहे. त्यापैकी प्राचार्य राम शेवाळकरांनी आधीच प्रस्तावना लिहिल्याने आबासाहेबांवर पुस्तक लिहून पूर्ण करण्याचे बंधन आले, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.
आबासाहेब हे संस्कारांचे मंदिर आहे. अशा मंदिराचा फायदा समाजाला होतो. १९६२ साली जनसंघाची स्थापना झाली, त्यानंतर दोनतीन वर्षांतच आबासाहेब लोकांमधून निवडून जाऊन डोंबिवलीचे नगराध्यक्ष झाले. तेव्हा ते संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरले होते. पुण्यात जसे सार्वजनिक काका असतात, तसे आबासाहेब हे डोंबिवलीतील सार्वजनिक आबासाहेब आहेत, असे सांगत नाईक यांनी त्यांच्या विविध क्षेत्रांतील सामाजिक कामांचा उल्लेख केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ध्येयपूजक आहे, व्यक्तिपूजक नाही. त्या चौकटीत राहून पटवारी यांचे काम विचारधारेचे प्रतिनिधित्व रुजवणारे आहे. पटवारी यांचे हे ‘सहस्रचंद्रदर्शन’ नसून ‘सहस्रगुणदर्शन’ आहे, असे कौतुक करत डॉ. कुकडे यांनी पटवारी यांचे कार्य हे हिंदू नवजागरण असल्याकडे लक्ष वेधले. अमरावतीच्या खोपपूर गावापासून ठाणे, डोंबिवली हा आबासाहेबांचा प्रवास थक्क करणारा आहे. तो शब्दबद्ध करण्याचा अनुभव आनंददायी असल्याचे साहित्यिका सुलभा कोरे म्हणाल्या.
आबासाहेब ही चालतीबोलती संस्था आहे. त्यांचा आशीर्वाद लाभल्यानेच राजकीय आणि सामाजिक जीवनात चांगली वाटचाल करता आली, अशी भावना राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Abasaheb is the second Lokmanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.