अबब! ठाण्यात ३५३ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:12 AM2021-01-16T00:12:24+5:302021-01-16T00:13:03+5:30
गुरुवारी १६१ पक्षी दगावले : मुंब्य्रात १३४ मृत कोंबड्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लूने वेगाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी शहरात एकाच दिवशी १६१ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १३४ कोंबड्यांचा समावेश आहे. तर गुरुवारपर्यंत शहरात ३५३ विविध जातीच्या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. मुंब्य्रात गुरुवारी अज्ञात वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत असलेल्या कोंबड्या सोडून पळ काढल्याने महापालिकेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
राज्यात आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने दस्तक दिली आहे. ठाण्यातदेखील या आजाराने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले वर्षभर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता कुठे मूळपदावर येत असतानाच या नव्या संकटाने सर्व जण धास्तावले आहेत. राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतित असून अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका सतर्क झाली आहे. महापालिकेने एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणताही पक्षी मृत आढळल्यास नागरिकांनी तत्काळ दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कले आहे.
कसाऱ्यात ३८ कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू?
कसारा : कसाऱ्यात वॉर्ड नंबर २ मधील रहिवासी दिलीप साबळे यांच्या कोंबड्यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला असतानाच हरी पराड यांच्या १६ तर राजू फसाळे यांच्या २२ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या वॉर्डमध्ये दोन दिवसांपूर्वीच लसीकरण करूनसुद्धा कोंबड्यांचा मृत्यू फेरा थांबलेला नाही. एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्या दगावल्याने पशुवैद्यकीय विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली असून मृत कोंबड्यांचे नमुने कार्यशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणी अहवाल येताच प्रशासन तातडीच्या उपाययोजना सुरू करणार असून खबरदारी म्हणून कसारा गावातील एक किलोमीटर परिसरातील हजारो कोंबड्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पशुधन अधिकारी प्रशांत दळवी यांनी दिली. मृत कोंबड्यांपैकी काही कोंबड्यांना संसर्ग असल्यामुळे कसारा परिसरात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
कोंबड्या मृतावस्थेत सोडून पळ काढणाऱ्या ‘त्या’ वाहनचालकाचा शोध सुरू
पालिकेने मागील काही दिवसांत शहरातील चिकन दुकानांची पाहणी केली होती. परंतु, त्यात काही विशेष आढळलेले नाही. बुधवारपर्यंत शहरात एकाही कोंबडीचा मृत्यू झाला नव्हता. परंतु, आता मुंब्य्रात एकाच दिवशी १३४ कोंबड्या मृतावस्थेत सोडून पळ काढणाऱ्या वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी महापालिकेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या कोंबड्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांची विल्हेवाट लावली आहे. दुसरीकडे बर्ड फ्लूने शहरात ४ पोपटांचा मृत्यू झाला आहे.
पक्षी मृत्यूचा तक्ता
पक्ष्यांचा प्रकार संख्या
कोंबडी १३४
बगळे २५
कावळे १४३
कबुतर ३६
पोपट ४
पाणकोंबडी १
कोकीळ १
बदक १
गरुड १