अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 09:13 PM2022-08-19T21:13:42+5:302022-08-19T21:14:35+5:30
भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे.
विशाल हळदे -
ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यात एक तर सुका दुष्काळ, नाही तर ओला दुष्काळ पहायला मिळतो. आपण नुकताच भारतिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केले. हर घर तिरंगाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि तिरंगा घेऊन प्रभात फेऱ्या काढल्या गेल्या. असे असताना आज ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्याच्या गुंडे ग्रामपंचायतीत असणाऱ्या भितारवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जंगलातून 3 किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून येताना पहायला मिळाले.
भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. या वाड्यातील विद्यार्थ्यांची पसंती याच शाळेला आणि येथील शिक्षकांना आहे. 27 जणांची पटसंख्या असलेल्या या शाळेत भितारवाडी आणि कोठेवाडी येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आपला जिव धोक्यात घालून मधे असलेली नदी ओलांडून यावे लागते. मुख्य म्हणजे ऐन पावसाळ्यात नदी ओलांडावी लागत असल्याने मुलांची शाळेला सुट्टी होत आहे आणि खरच अभ्यासू असणारी ही मूलं शिक्षणा पासून वंचित रहात आहेत.
जोरदार पाऊस आला की डोंगर भागातून येणाऱ्या पावसाने नदीच्या पात्रात वाढ होते आणि पाणी वहाते असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतो. पावसाने उसंत घेतल्यानंतरच मुलाना शाळेत हजेरी लावता येते, असे पालकांकडून सांगण्यात आले.
एकीकडे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे केले, तरीही येथील विद्यार्थी आणि येथील लोकांना रस्ता, पुल, निदान साकव या सुविधा नसल्यामुळ शिक्षण आणि रोजगार यांपासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आज दिसून आले. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे आणि योग्य सुविधा व्हाव्यात या साठी पालकानी वेळो-वेळी लक्ष वेधले मात्र प्रशासनान त्याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला खंड पडल्याचे जाणवले. या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका आणि पालकानी केली आहे.
या वाड्यांमधे 400 जनांची लोकसंख्या आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी स्वतः मी नदीवर जातो नदित उतरून मी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येतो आणि शाळा सुटली की पुन्हा नदीच्या काठावर नेऊन सोडतो. माझ्यासोबत पालक देखील असतात. गेल्या कित्येक वर्षापासून आमचा असाच प्रवास सुरु आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक अतुल बडे यांनी सांगितले.