उल्हासनगरात ३ दिवसाच्या मुलाचे अपहरण; तिघांना अटक, मुलगा सुरक्षित
By सदानंद नाईक | Published: December 3, 2023 06:43 PM2023-12-03T18:43:08+5:302023-12-03T18:43:16+5:30
बाळाला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने तिघांना ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
उल्हासनगर: कॅम्प नं-२, तानाजीनगर येथील ३ दिवसाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुजरात सुरतवरून तिघांना अटक केली. बाळाला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने तिघांना ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
उल्हासनगर येथील तानाजीनगर येथील दाम्पत्याचे ३ दिवसाच्या नवजात बाळाचे १० ऑक्टोबर रोजी म्हणजे ४० दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची तक्रार नवजात बाळाच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ३ दिवसांपूर्वी केली. उल्हासनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून, तपासाचे चक्र फिरवित अवघ्या काही तासात गुजरात सुरत मधून तिघांना अटक केली. त्यांच्याकडे असलेले बाळ सुखरूप असून नवजात बाळ त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याचे तपास अधिकारी समाधान हिरे यांनी दिले. तर न्यायालयाने तिघांना ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहरातील ३ दिवसाच्या नवजात बाळाचे अपहरण होऊनही ४० दिवस उलटल्यानंतरही आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही? असा प्रश्न उल्हासनगर पोलिसांना पडला. हा बाळ विक्रीचा प्रकार तर नाही ना? की यापेक्षा वेगळा प्रकार आहे. या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. नवजात बाळ अपहरण प्रकरणी खंडणी मगितल्याचेही बोलले जात आहे. या गुन्ह्यातील आरोपी व अपहरणग्रस्त नवजात बाळाच्या आई-वडिलांचे नाव पोलिसांनी उघड केले नाही. असे पोलिसांचे म्हणणे आहे.