अबब... दिव्यात जमिनीखाली दीड हजार अनधिकृत नळजोडण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 01:59 AM2019-06-02T01:59:18+5:302019-06-02T06:30:34+5:30

ठामपाच्या शोधमोहिमेत सापडले घबाड । ३०० जोडण्या केल्या खंडित

Abe ... Thousands of unauthorized tussles in the lamps | अबब... दिव्यात जमिनीखाली दीड हजार अनधिकृत नळजोडण्या

अबब... दिव्यात जमिनीखाली दीड हजार अनधिकृत नळजोडण्या

Next

ठाणे : दिवा भागात पाणीटंचाईवरून सध्या चांगलाच वादंग सुरू आहे. या भागाला कमी पाणीपुरवठा होतो. टँकरने पाणीपुरवठा होतो, अशी ओरड सुरू आहे. त्यामुळे यावर पालिकेने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या करत असतानाच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिव्यात चक्क सुमारे तीन ते चार फूट खोल जमिनीखाली अनधिकृत नळजोडण्या घेऊन पाणीचोरी करणाऱ्यांचे मोठे घबाड सापडले आहे. तब्बल तीन किमीपर्यंत हे जाळे पसरले असून यामध्ये तब्बल १५०० हून अधिक जोडण्यांद्वारे पाणीचोरी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

दिवा भागाला सध्या ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तो वाढवून मिळावा, यासाठीही प्रयत्न सुरूआहेत. तसेच दिवा, मुंब्रा भागांसाठी रिमॉडेलिंग योजनेचेही काम आता सुरू होत आहे. मुंब्य्रापेक्षा पाणीटंचाईचे प्रमाण दिव्यात अधिक आहे. या भागाला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही पाणी जाते कुठे, असा प्रश्न पालिकेला सतावत होता. 

दरम्यान, मधल्या काळात पालिकेने या भागात कारवाई करून अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या होत्या. परंतु, त्यानंतरही पाणीटंचाईचा प्रश्न काही सुटू शकला नव्हता. आता मात्र पालिकेमार्फत येथील अनधिकृत नळजोडण्यांचा शोध सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भागात ४५० मीमी व्यासाची १८ इंचाची जलवाहिनी जमिनीखालून गेली आहे. त्यात अनेक भागांत तीवर टॅब मारून अनधिकृत कनेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. तब्बल तीन ते चार फूट जमिनीच्या खाली हे टॅब मारल्याचे दिसून आले असून त्यावर दीड ते दोन इंचाचे कनेक्शन जोडल्याचे आढळले. ही जलवाहिनी निळजे ते आगासन अशी तीन किमीपर्यंत खोदली असून त्याखाली तब्बल १५०० हून अधिक अनधिकृत नळकनेक्शन घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वार्षिक एक कोटी वाचले
यातील ३०० कनेक्शन मागील पाच दिवसांत खंडित केले असून उर्वरित कनेक्शनही खंडित केले जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.
हे संपूर्ण कनेक्शन खंडित केल्यानंतर या मुख्य जलवाहिनीवर सिमेंट काँक्रि ट टाकले जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
पाणीपुरवठा विभागाने ही सर्वात मोठी चोरी उघडकीस आणली असून यातून पालिकेला वार्षिक एक कोटीचा भुर्दंडसुद्धा सहन करावा लागत होता. ही कनेक्शन किती जुनी आहेत, याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही.

Web Title: Abe ... Thousands of unauthorized tussles in the lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.