वक्तृत्व स्पर्धेत रूईया महाविद्यालयाची आभा भोसले प्रथम; सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात वक्तृत्वाचा महायज्ञ

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 8, 2022 07:07 PM2022-10-08T19:07:29+5:302022-10-08T19:10:24+5:30

वक्तृत्व स्पर्धेत रूईया महाविद्यालयाची आभा भोसले हिचा प्रथम क्रमांक आला आहे. 

Abha Bhosle of Ruia College has won the first rank in the elocution competition  | वक्तृत्व स्पर्धेत रूईया महाविद्यालयाची आभा भोसले प्रथम; सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात वक्तृत्वाचा महायज्ञ

वक्तृत्व स्पर्धेत रूईया महाविद्यालयाची आभा भोसले प्रथम; सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात वक्तृत्वाचा महायज्ञ

Next

ठाणे: सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात अत्यंत चुरशीच्या रंगलेल्या वक्तृत्व स्पर्धेत माटुंगा येथील रूईया महाविद्यालयातील आभा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे बी.एन.एन महाविद्यालयातील अनन्या म्हात्रे व अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील स्वरा सावंत यांनी पटकावले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात 'कै.ग.का.फणसे व कै.इंदिराबाई फणसे स्मृती चषक' कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'कै. इंदिराबाई फणसे' या मथळ्यांतर्गत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यंदाही उत्कांठावर्धक झाली. यात तब्बल २७ महाविद्यालयातील एकूण ४२ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. याव्यतिरीक्त प्रगती अतकरे (महात्मा गांधी विद्यालय व क.महाविद्यालय), सृष्टी बागे (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय,वसई), रागिनी भोसले (बी.एन.बांदोडकर महाविद्यालय), सृष्टी वडे (मोतीलाल कानजी महाविद्यालय), श्रद्धा बरगे (के.जे.सोमय्या महाविद्यालय) या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या बक्षीसपात्र आठ स्पर्धकांमध्ये उस्फूर्त वक्तृत्वस्पर्धा घेण्यात आली. यातून केवळ एका स्पर्धकाची निवड केली जाते. या चुरशीच्या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेतही आभा भोसले हिलाच यश मिळाले. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिषा नाईक व प्रसिद्ध लेखिका यामिनी पानगावकर यांनी केले.

तरूणांमधून देशहितास आवश्यक विचारसंपन्न वक्ते घडावेत या उदात्त हेतूने सदर वक्तृत्व स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली, यंदाचे या स्पर्धेचे १८ वे वर्षे होते. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व पुस्तक तर, विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, चषक व फिरता चषक देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेसाठी यंदा 'मला राजकारणात जायचंय…!’,'अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा, मागोवा देशस्थितीचा, 'साहित्यिकांची जन्मशताब्दी म्हणजे वाचन महोत्सव', 'आभासी शिक्षणव्यवस्था -सकारात्मक की नखकारात्मक', 'कृत्रिम जगाची वाढती मागणी : प्रगतीची खूणा की धोक्याची नांदी’ अशा विविध विषयांचा समावेश होता. या वक्तृत्वस्पर्धेत ‘प्रत्येक विषयाला असंख्य कंगोरे असतात, त्यामुळे विषयाचा सखोल अभ्यास उत्कृष्ट वक्तृत्वासाठी आवश्यक आहे’ असे अभिनेत्री नाईक यांनी सांगितले. स्पर्धा प्रमुख प्रा.मनिषा राजपूत यांनी प्रास्ताविक सादर केले. प्रा.हरेश्वर भोये यांनी सूत्रसंचालन तर प्रा.दिलीप वसावे, प्रा.महेश कुलसंगे यांनी परीक्षकांची ओळख करून दिली. संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान व प्राचार्य डॉ.गणेश भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.


 

Web Title: Abha Bhosle of Ruia College has won the first rank in the elocution competition 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.