कळव्यातील अनधिकृत बांधकामांना अभय; सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर
By जितेंद्र कालेकर | Published: December 24, 2023 07:28 PM2023-12-24T19:28:47+5:302023-12-24T19:54:33+5:30
ठाणे किंवा राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
ठाणे: ठाणे किंवा राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी अलिकडेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवून कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती महापालिका प्रशासनाने रविवारी दिली.
ठाणे शहरातील मानपाडा, माजीवडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील अनधिकृत बांधकामांवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली होती. त्याचवेळी त्यांनी उपरोधिकपणे सत्ताधाऱ्यांना घरचा आहेरही दिला होता. अनधिकृत बांधकामांना अभय दिल्यानंतर कारवाई करुन घ्यायची नसल्यास अधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेमध्ये नियुक्तीवर यावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. ठामपा क्षेत्रात अनधिकृत बांधकामांसाठी प्रती चौरस फूटांमागे अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याच लक्षवेधीवर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे तसेच अशा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्याचबरोबर अशी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही संकेत त्यांनी दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना ४५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली होती. कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी सूचना देऊनही अशा बांधकामांवर कारवाई केली नसल्याचेही रोडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. ठाणेकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी यापूर्वीही ठाणे महापालिका मुख्य भवनासमोर काही नागरिकांनी फलकबाजी केली होती. त्यावेळी ठाणेकर हे चर्चेत आले होते. आताही त्यांना निलंबनाऐवजी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.