"तलाव संवर्धनाच्या कामांनंतर तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख अभिमानाने सागंता येईल"

By अजित मांडके | Published: January 12, 2024 07:02 PM2024-01-12T19:02:20+5:302024-01-12T19:03:57+5:30

कार्यशाळेचे उद्घाटन करताना, बांगर यांनी महापालिकेच्या वतीने तलाव संवर्धनासाठी होते असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

abhijit bangar said, After the lake conservation works, Thane can proudly claim to be the city of lakes |  "तलाव संवर्धनाच्या कामांनंतर तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख अभिमानाने सागंता येईल"

 "तलाव संवर्धनाच्या कामांनंतर तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख अभिमानाने सागंता येईल"

ठाणे: ठाण्याची ओळख 'तलावांचे शहर' अशी अभिमानाने सांगता यावी, या दृष्टीने ठाण्यातील तलावांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलाव जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळांमधून आणखी चांगली दिशा मिळेल, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी 'तलावांचे शाश्वत संवर्धन' या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन करताना केले. ठाणे महापालिकेतर्फे आयआयटी, मुंबई, सीएसआयआर (CSIR), आसीसीएसए (ICCSA) आणि बेग (BEAG) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे तलाव आणि पाणवठे यांचे शाश्वत संवर्धन या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, सीएसआयआरचे संचालक राकेश कुमार, मुंबई महानगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाचे उपसंचालक श्रीकांत देशमुख, उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम, महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेचे उद्धाटन केले. 

या कार्यशाळेचे उद्घाटन करताना, बांगर यांनी महापालिकेच्या वतीने तलाव संवर्धनासाठी होते असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच, तलाव संवर्धनासाठी जास्तीचा निधी आवश्यक नसून संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मेहनत करणाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले. महापालिकेसोबत ग्रीनयात्रासारखी स्वयंसेवी संस्था एकत्र काम करीत असून सात तलावांच्या संवर्धनाची जबाबदारी ग्रीनयात्राने घेतली असल्याचे ते म्हणाले. तलाव संवर्धन हे सोपे काम नसले तरी ते अशक्य नाही. ठाण्यातील तलावांचे संवर्धन करून त्याचे अभिमानाने सांगता येईल असे ब्रॅडिंग करण्यात येईल, असेही श्री. बांगर म्हणाले. या कार्यशाळेमागील प्रेरणा ही सीएसआयआरचे संचालक राकेश कुमार यांची असून या कार्यशाळेचा सर्वच महापालिकांना उपयोग होईल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

सीएसआयआरचे संचालक राकेश कुमार यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. जगाच्या प्राधान्यक्रमात उर्जेपाठोपाठ पाणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यादृष्टीने पाण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ब्राझील आणि सौदी अरेबिया यांनी त्याबाबत आघाडी घेतली आहे. आपणही पाणी, सांडपाणी यांचे नियोजन याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे राकेश कुमार यांनी नमूद केले. पाण्याशी संलग्नता, पाण्याचे लेखापरिक्षण, पाणी व्यवस्थापक या तीन सूत्रांभोवती विचार होण्याची गरज आहे. तसेच, तलाव संवर्धनाच्या कामात भांडवली गुतंवणुकीपेक्षा तलावांचे व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा आहे, असेही राकेश कुमार यांनी स्पष्ट केले. 

या कार्यशाळेत, मुंबई महानगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाचे उपसंचालक श्रीकांत देशमुख यांनी विकास आराखड्यातील कायदेशीर तरतुदींबद्दल विवेचन केले. तर, तलावांच्या शाश्वत संवर्धनासाठी उपयोगी ठरणारी नाविन्यपूर्ण साधने, नैसर्गिक भूरचना यांच्याविषयीचे सादरीकरण वास्तू रचनाकार आकाश हिंगोराणी आणि युसुफ आरसीवाला यांनी केले. सांडपाण्यावर प्रक्रिया, त्याचा पुर्नवापर, तंत्रज्ञानातील नवीन पर्याय, त्याचा प्रभावी वापर याबद्दल आयआयटी, मुंबईतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रदीप कलबार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. तुहीन बॅनर्जी यांनी तलाव संवर्धनाबाबतच्या तांत्रिक बाबींचा उहापोह केला. शेवटच्या सत्रात, डॉ. प्रियंका जमवाल, डॉ. हेमंत भेरवाणी, डॉ. अजय ओझा यांनी तलाव संवर्धनाबाबतेच विविध पर्याय मांडले. या कार्यशाळेचा समारोप हेमा रमाणी, नवीन वर्मा, राजेश पंडित यांच्या चर्चासत्राने झाला. त्याचे संचालन महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केले. कार्यशाळेत, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार आणि पनवेल महानगरपालिकांचे प्रतिनिधी, ग्रीन यात्रा, एन्व्हारो व्हिजिल, ठाणे तलाव संवर्धन समिती आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
 

Web Title: abhijit bangar said, After the lake conservation works, Thane can proudly claim to be the city of lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.