अंगणवाडीच्या अबोल भिंती विविध चित्रांनी झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 01:01 AM2020-11-22T01:01:36+5:302020-11-22T01:01:55+5:30
कमळेवीर परिसरातील अंगणवाडीचे हे स्वरूप बदलण्याचे काम मातृसेवा संस्थेच्या संध्या सावंत आणि सुहास सामंत यांनी हाती घेतले. "कोऱ्या कागदावर काही लिहिल्याने त्याला जिवंतपणा येतो
ठाणे : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा, अंगणवाड्या बंद आहेत. विद्यार्थी घरांत असल्याने विद्यार्थ्यांंची किलबिल बंद झाली आहे. २२ मार्चपासून टाळेबंदीमुळे मुलांच्या एकसुरातील आवाजामुळे दुमदुमून जाणारा शाळेचा परिसर शांत वाटतोय. पण, लवकरच ही शांतता दूर होईल. पुन्हा एकदा तो परिसर मुलांच्या किलबिलाटाने गजबजेल, असा विचार करून मातृसेवा संस्थेने लॉकडाऊनमध्ये या अबोल भिंतींना बोलके करण्याचा प्रयत्न केला आहे.
संस्थेने सिंधुदुर्ग येथील झाराप गावातील अंगणवाडीच्या बोलक्या भिंती रंगवून देण्याचे आणि डागडुजीचे कार्य पूर्णत्वास नेले. त्याचे उदघाट्न शनिवारी पार पडले.
कमळेवीर परिसरातील अंगणवाडीचे हे स्वरूप बदलण्याचे काम मातृसेवा संस्थेच्या संध्या सावंत आणि सुहास सामंत यांनी हाती घेतले. "कोऱ्या कागदावर काही लिहिल्याने त्याला जिवंतपणा येतो, तसेच कोऱ्या भिंतींवर लिहिल्यानेसुद्धा भिंती बोलक्या होतात." असे संध्या म्हणाल्या.
वार, रंगओळख, आकड्यांच्या मदतीने गणिताची उजळणी घेणारे फलक आणि रंगसंगतीमुळे शाळेच्या भिंती जणू विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. एवढेच नव्हे तर स्वच्छतेचे आणि बाळबाळंतिणीसाठी योग्य संदेशही भिंतीवर उमटवले आहेत.
विशेष म्हणजे एक भिंत मुलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. भिंतीवर सचित्र रेखाटलेली अक्षरं, अंक व अधिक तपशील दीर्घकाळ मुलांच्या लक्षात राहतो.