जिल्ह्यातील ९६३ शाळांसह १६६ आरोग्य संस्था तंबाखू मुक्तच; २०५ जणांवर कोपटा कायद्यांतर्गत कारवाई
By अजित मांडके | Published: May 30, 2024 05:31 PM2024-05-30T17:31:29+5:302024-05-30T17:32:13+5:30
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
अजित मांडके,ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ९६३ शाळा तर, १६८ आरोग्य संस्था तंबाखू मुक्त झाल्या आहेत. तर, दुसरीकडे कोपटा कायद्यानुसार २०५ जनावर दंडात्मक कारवाई करीत ४१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जागतिक तंबाखू नकार दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.
ज्या ठिकाणी देशाची भावी पिढी शिक्षण घेत आहे. ती संस्कारक्षम व्हावी, धूम्रपान, मद्यपान या अनिष्ट व्यसन प्रवृत्ती पासून ती दूर रहावी यासाठी ही ते प्रयत्न करीत आहे. त्यानुसार शाळा व शाळा परिसर हा तंबाखू मुक्त शाळा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे तीन बॅनर लावले येत आहे, तसेच ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील अशा शाळा ह्या तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सलाम मुंबई फाऊंडेशनच्या ॲपवर नोंद करण्यात येत असते. नोंदणी झालेल्या शाळांपैकी ज्या शाळांनी तंबाखू मुक्तीचे ११ निकष पूर्ण केले, अशा ९६३ शाळा तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद अशा १६६ शासकीय संस्था देखील तंबाखू मुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
तंबाखू मुक्ती केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १२ हजार १३९ तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्याचे समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनाची फलसृती म्हणजे १४९ जण तंबाखू मुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
२०५ जणांवर दंडात्मक कारवाई -
मागील वर्षी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयाच्या आवारात थुंकणाऱ्या ८७० जणांवर दंडात्मक कारवाई करीत एक लाख ६३ हजार ९१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, यंदाच्या वर्षी एकट्या एप्रिल महिन्यात २०५ जणांवर कारवाई करीत ४१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
तंबाखू उद्योग हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे या थीमला अनुसरून शालेय जीवनातील विद्यार्थ्यांमध्ये अथवा महाविद्यालयीन युवकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तसेच मैखिक कर्क रोगा बद्दल जनजागृती करणे व त्याचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देत असते. सध्या स्थितीत ९६३ शाळा व १६६ शासकीय संस्था तंबाखू मुक्त झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील अन्य शाळा व संस्था देखील तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे.- डॉ. अर्चना पवार, जिल्हा दंतचिकित्सक, ठाणे.