पालिकेच्या सेवेतून २३ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त; शिक्षक, सफाई कामगारांचा समावेश
By अजित मांडके | Published: March 1, 2024 04:47 PM2024-03-01T16:47:09+5:302024-03-01T16:49:00+5:30
ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही.
अजित मांडके , ठाणे : ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यात पालिकेच्या सेवेतून २३ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. यात शिक्षण विभागातील शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. त्यातही शिक्षक भरतीचा मुहुर्त अद्यापही होत नसल्याने त्याचा भार आता अतिरिक्त शिक्षकांच्या खांद्यावरच येणार हे यातून दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली आहे. याचाच अर्थ दोन महिन्यात ५० अधिकारी कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याने पालिकेत आणखी पोकळी वाढत जात आहे. त्यातही आता फेब्रुवारी महिन्यात सेवा निवृत्त झालेल्यांमध्ये शिक्षकांची संख्या अधिकची असल्याचे दिसून आले आहे. यात मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, बालवाडी आया, आदींची संख्या अधिक दिसून आली आहे. महापालिकेच्या प्राथमिक १११ आणि माध्यमिक २३ अशा मिळून १३४ शाळा आहेत. या शाळांमधून सद्यस्थितीत ३५ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका शाळांमध्ये ९०० पदे मंजुर असली तरी देखील प्रत्यक्षात ६७० शिक्षकच उपलब्ध आहेत. त्यामुळे एका एका शिक्षकाला दोन दोन वर्ग शिकविण्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे.
परंतु शिक्षकांची ही कमतरता भरुन काढण्यासाठी महापालिकेने तब्बल २४३ तासिका शिक्षकांची कंत्राटी स्वरुपात भरती केली आहे. त्यातील अनेक शिक्षकांनी पुन्हा खाजगी शाळांकडे आपला मोर्चा वळविला आहे. दुसरीकडे माध्यमिक विभागाचा विचार केल्यास याच्या २२ शाळा असून त्यामध्ये आजच्या घडीला ४ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याठिकाणी शिक्षकांची मंजुर पदे ही ५४ असून त्यातील ४२ कार्यरत आहेत. परंतु दरमहा सेवा निवृत्तांमध्ये शिक्षकांची संख्या वाढत जात असल्याचे चित्र आहे. त्यात अनेक शाळांना मुख्याध्यापक नसल्याने शिक्षकांच्या खांद्यावर मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आल्याचेही चित्र दिसत आहे. त्यात शिक्षकांना विविध कामांच्या ड्युट्या लावल्या जात असल्याने देखील त्याचाही परिणाम शिक्षणांवर होतांना दिसून आला आहे.
दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांबरोबरच १२ सफाई कामगारांची संख्या देखील वाढल्याचे दिसत आहे. त्यात एका सफाई कामगाराने स्वेच्छा निवृत्ती पत्करली आहे. याशिवाय बिगारी, शिपाई, फिल्ड वर्कर, कार्यालयीन उपअधिक्षक, मराठी लघुलेखक, पंपचालक, मुकादम. आरक्षक, रिक्षाचालक आदी देखील फेब्रुवारी महिन्यात सेवा निवृत्त झाले आहेत.
मे, जूनमध्ये महत्वाचे अधिकारी होणार सेवा निवृत्त : सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचारी, अधिकाºयांची संख्या ही मार्च नंतर आणखी वाढणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यातही येत्या मे आणि जूनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, शहर विकास विभागातील वरीष्ठ अधिकारी देखील सेवा निवृत्त होणार असल्याने त्यांच्या कामांचा ताण इतर अधिकाºयांच्या खांद्यावर अतिरिक्त स्वरुपात सोपविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.