भिवंडीत जमीन विक्री व्यवहारात ४२ लाखांची फसवणूक ,तिघांविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Published: April 24, 2024 06:02 PM2024-04-24T18:02:27+5:302024-04-24T18:02:49+5:30
जमीन विक्रीच्या व्यवहारातून जमीन मालकाची ४२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नितीन पंडित, भिवंडी: जमीन विक्रीच्या व्यवहारातून जमीन मालकाची ४२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पडघा नजीकच्या भोकरी,राहुर, कुंभारशिव,वडवली तर्फे राहुर व खानिवली या गावात चर्चगेट मुंबई येथे राहणारे व्यंकटेश नारायण कुलकर्णी,पत्नी लता,मुलगा कुणाल यांच्या मालकीची कंपनी मानस रूरल डेव्हलपमेंट इन्स्टीट्युट या संस्थेच्या नावे असलेली १५ एकर ९ गुंठे जमीन आहे. सदर जमीन भिवंडी येथील सुनिल हरिश्चंद्र घायाळ यांना विक्री करण्याचा व्यवहार केला.
त्यासाठी सहाय्यक नोंदणी कार्यालयात साठेकरार नोंद करून त्या बदल्यात सुनिल घायाळ त्यांचे वडील व पत्नी यांचेकडुन ४२ लाख रूपये धनादेशाद्वारे स्वीकारले.परंतु त्यानंतर सदची जमीन ही सुनिल घायाळ यांना विक्री न करता ३१ डिसेंबर नंतर इतर व्यक्तीस विक्री करून घायाळ व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वासघात करून ४२ लाख परत न देता फसवणुक केली. रक्कम परत मागण्यासाठी सुनिल घायाळ हे कुलकर्णी कुटुंबीयांकडे गेले असता त्यास शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.या प्रकरणी सुनिल घायाळ यांनी दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा तिघांविरोधत दाखल करण्यात आला आहे.