होर्डिंग परवानगीबद्दल पालिकाच दुटप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:52 AM2017-08-03T01:52:14+5:302017-08-03T01:52:14+5:30
महापालिकेच्या जागेत कंत्राट दिलेल्या होर्डिंगवर आचारसंहिता असतानाही राजकीय बॅनर लावण्यासाठी परवानगीची गरज नाही असा दावा पालिका अधिकाºयांनी केला आहे.
मीरा रोड : महापालिकेच्या जागेत कंत्राट दिलेल्या होर्डिंगवर आचारसंहिता असतानाही राजकीय बॅनर लावण्यासाठी परवानगीची गरज नाही असा दावा पालिका अधिकाºयांनी केला आहे. मात्र होर्डिंगसाठी प्रभाग अधिकारी, पोलीस यांच्या परवानगीची गरज असल्याचा फलक मुख्यालयात लावण्यात आला आहे. यामुळे परवानगीबद्दल पालिकाच दुटप्पीपणा करत असल्याचे बोलले जात आहे.
आचारसंहिता लागू असताना परवानगी न घेताच सत्ताधारी भाजपाचे बॅनर पालिका जागेतील कंत्राटदारांच्या हॉर्डिंगवर लागल्याने सर्वच पक्षांनी होर्डिंगसह उपायुक्त दीपक पुजारी, विभागप्रमुख संजय दोंदे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी पुजारी व दोंदे यांनी कंत्राटदाराने पालिकेला माहिती द्यावी. आचारसंहिता असली तरी राजकीय प्रचाराच्या जाहिरातीसाठी पालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचा दावा केला होता.
पालिका मुख्यालयात लावलेल्या विविध परवानगीबाबतच्या फलकावर मात्र होर्डिंगसाठी स्थानिक प्रभाग अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना कळवण्यासह आयोगाच्या १९९५ च्या पत्राचे पालन करण्यास सांगितले आहे. शिवाय मुद्रक, प्रकाशकाचे नाव व परवानगीचा उल्लेख करण्यास सांगितले असले तरी मुद्रक, प्रकाशक यांचा पत्ता मात्र होर्डिंगवर टाकलेलाच नाही.
आदित्य अॅडव्हटायझिंग, दीपलक्ष्मी व सरस्वती अॅडव्हटायझिंग या कंत्राटदारांनी राजकीय प्रचारासाठी होर्डिंग दिले असले तरी पालिकेला दिलेल्या तिघांच्याही पत्रावर तारखेत खाडाखोड करून २१ अशी समान तारीख टाकली आहे. यावरून भाजपाच्या बेकायदा फलकांना पाठीशी घालण्यासाठी पालिकेने हा खटाटोप केल्याचा आरोप सुलतान पटेल यांनी केला आहे.