पाच वर्षांत जिल्ह्यात सुमारे नऊ हजार घरकुले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:54+5:302021-02-11T04:41:54+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबियांचे पक्क्या घराचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेसह राज्य ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबियांचे पक्क्या घराचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेसह राज्य पुरस्कृत घरकुल योजना, महाआवास योजना राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणांच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येत आहेत. २०१६-१७ ते २०२०- २१ या पाच वर्षांत जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत आलेल्या उद्दिष्टांपैकी सुमारे नऊ हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दिली.
जिल्ह्यातील महापालिकांसह नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहे. कच्चे घर असलेल्या आदिवासी, गरीब कुटुंबियांना या घरकुलांचा लाभ दिला आहे. यासाठी संबंधितांना ऑनलाइन अर्ज करावा लागत असल्यामुळे त्यांना मंजुरीदेखील ऑनलाइन दिली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून, शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करीत आहेत.
दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांसाठी सहा हजार ७२८ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी सहा हजार ६४२ घरकुलांच्या प्रस्तावाला ऑनलाइन मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत पाच हजार ७०५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर राज्य पुरस्कृत शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम जमाती घरकुल योजना व रमाई आवास योजनेंतर्गत तीन हजार ४९० घरकुलांना मंजुरी दिलेली असून, त्यापैकी दोन हजार ७७७ घरकुले पूर्ण झाली आहेत. ८२ टक्के घरकुले पूर्ण झाली असून, अद्यापही ७१३ घरकुले अपूर्ण आहेत.