शेअर मार्केट मध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने १९ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
By अजित मांडके | Published: June 15, 2024 04:31 PM2024-06-15T16:31:11+5:302024-06-15T16:32:11+5:30
या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी दिली.
अजित मांडके,ठाणे : ऑनलाईन शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ठाण्यातील कोलशेत रोड येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय शैलेश तिवारी यांची १९ लाख ८६ हजाराची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी दिली.
यातील तिवारी यांना १० एप्रिल ते ८ मे २०२४ या कालावधीत काही अनोळखी भामट्यानी फेसबुक व मोबाईलवर मॅसेज करून ऑनलाईन शेअर मार्केट मधुन शेअर्स खरेदी केल्यास अधिक परतावा मिळेल, अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून तक्रारदार यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सागितले. या ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे अमिष दाखवून एकुण १९ लाख ८६ हजार रूपये ही रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडली. त्यानंतर ही रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिवारी यांनी या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.