...अबब ३६ टक्के पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:24 AM2018-05-29T01:24:02+5:302018-05-29T01:24:02+5:30

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील वाढत्या लोकवस्तीकरिता पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने २८२ कोटी मंजूर केले.

... Above 36 percent water level | ...अबब ३६ टक्के पाणीगळती

...अबब ३६ टक्के पाणीगळती

googlenewsNext

पंकज पाटील 
अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील वाढत्या लोकवस्तीकरिता पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने २८२ कोटी मंजूर केले. त्यातील ८० टक्के खर्च करण्यात आहे. मात्र, असे असतानाही शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी तब्बल ३६ टक्के पाणीगळती आहे. नव्याने योजना तयार केल्यास पाणीगळतीचे प्रमाण कमी होईल, असा दावा अधिकारी करत असले, तर यापूर्वी खर्च झालेला पैसा पाण्यात गेल्यात जमा आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता १९२३ मध्ये उल्हास नदीवर बॅरेज धरण उभारून योजना कार्यान्वित केली गेली. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांची सध्याची लोकसंख्या ही सहा लाखांच्या घरात आहे. दोन्ही शहरांना दररोज १०६ दशलक्ष लीटर्स एवढा पाणीपुरवठा होत आहे. अंबरनाथमध्ये शहरी भागाकरिता दररोज ४७ दशलक्ष लीटर्स पाणी, तर आयुध निर्माण कारखान्यासाठी आठ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. म्हणजे दररोज ५५ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. उल्हासनदीतून सरासरी ४६ , एमआयडीसीकडून १० आणि चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लीटर्स असे एकूण ६२ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. मात्र, पाणी योजनेतील त्रुटीमुळे तब्बल २० दशलक्ष लीटर्स म्हणजे सरासरी ३६ टक्के पाण्याची गळती होते आहे. पाणीगळतीचा विचार करता अंबरनाथ शहराला १२ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. जीवन प्राधिकरणाने आपल्या पाणीगळतीचे प्रमाण ३६ टक्क्यांवरून १५ ते २० टक्क्यांवर आणले, तरी शहराला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाने गळती रोखण्यासाठी ठोस उपाय योजलेले नाहीत. त्यामुळेच पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही पाणीसमस्येला तोंड देण्याची वेळ अंबरनाथकरांवर ओढवली आहे.
बदलापूरचीही तीच अवस्था आहे. येथील लोकसंख्येचा विचार करता शहराला दररोज ३४ दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे. उल्हासनदीतून तब्बल ४३ दशलक्ष लीटर्स पाणी उचलण्यात येते. सरासरी नऊ दशलक्ष लीटर्स पाणी जास्तीचे उचलण्यात येत असले, तरी जीवन प्राधिकरणाने योजना अयोग्य पद्धतीने हाताळल्याने १२ दशलक्ष लीटर्स म्हणजे तब्बल ३६ टक्के पाणीगळतीचे प्रमाण ठेवले आहे. बदलापूरला गरजेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजनाअभावी शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची गळती जास्त असल्याने शहराला तीन दशलक्ष लीटर्स अतिरिक्त पाण्याची गरज आहे. ही तूट भरून निघत नसल्याने शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंबरनाथची पाणीपुरवठा योजना अपुरी : अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेत सुसूत्रता यावी, यासाठी नगरोत्थान प्रकल्पांतर्गत ७७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. पाण्याची गळती जास्त असल्याने या योजनेत नवीन जलवाहिन्या आणि जलकुंभ प्रस्तावित केले होते. मात्र, ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. या योजनेला १३ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत काम पूर्ण झाले नाही, हेच या योजनेचे अपयश म्हणावे लागेल. पहिलीच योजना अपूर्णावस्थेत असताना शासनाने अमृत अभियानांतर्गत नव्याने ५७ कोटींची योजना मंजूर केली.२०१६ मध्ये या कामाचे आदेश दिले. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. या योजनेत नवीन जलवाहिन्या प्रस्तावित आहेत. मात्र, नवीन जलवाहिन्या टाकूनही पाण्याची गळती रोखता येत नसल्याने प्राधिकरणाचे नियोजन चुकत आहे, हे स्पष्ट होत आहे.

कुळगाव-बदलापूर शहरांसाठी शासनाने नगरोत्थान योजनेतून ८१ कोटींची योजना मंजूर केली होती. त्या योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. नवीन जलवाहिन्या आणि जलकुंभ उभारण्यात आले. मात्र, तरीदेखील शहरातील पाणीगळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. मूळ योजना ही शहरातील टोकावरील भागांना पाणीपुरवठा करण्याबरोबर गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी तयार केली होती. मात्र, त्यात अपयश आले आहे. या योजनेतील अपयश समोर असतानाच अमृत अभियानांतर्गत नव्याने ६७ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतील जलवाहिन्या टाकण्याचे कामदेखील निकृष्ट झाल्याने या योजनेचे काम पूर्ण झाल्यावरही पाण्याची गळती कमी होईल, अशी अपेक्षा राहिलेली नाही. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असली, तरी दोन्ही शहरांची योजना ही जीवन प्राधिकरण सांभाळत आहे. जीवन प्राधिकरण पाणीव्यवस्थापन तज्ज्ञ असले, तरी वितरण व्यवस्थेत अपयशी ठरल्याचे अंबरनाथ आणि बदलापुरात स्पष्ट दिसत आहे. दोन्ही शहरांसाठी २८० कोटींपेक्षा जास्त
निधी दिलेला असतानाही योजनेतून काहीच साध्य
झालेले नाही. नवीन वस्त्यांना पाणीपुरवठा करत असताना अस्तित्वातील योजनेतील पाण्याची गळती मात्र रोखता आलेली नाही.

Web Title: ... Above 36 percent water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.