कारणे दाखवा नोटीस बजावूनही दोघे सहाय्यक आयुक्त बदलीच्या गैरहजर
By अजित मांडके | Published: August 18, 2022 03:18 PM2022-08-18T15:18:28+5:302022-08-18T15:19:34+5:30
शासनाकडे परत पाठविण्यासाठी पालिकेची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समिती व वर्तकनगरचे सहाय्यक आयुक्त सचीन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. मात्र बदली होऊनही हे अधिकारी आपल्या कर्तव्यावर हजर झालेले नसल्याने प्रशासनाकडून त्यांना कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतरही ते २४ तासाच्या आत कर्तव्यावर हजर न झाल्याने अखेर पालिका प्रशासनाने त्या दोघांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या दोघांनी जुन्याच ठिकाणी आपले कर्तव्य कायम ठेवण्यासाठी राजकीय मंडळीकरवी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केल्याचही माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटले असून या बेकायदा बांधकामांवरून पालिकेवर टीका होत आहे. असे असतानाच पालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली असून याशिवाय त्यांच्याकडे परवाना विभाग, क्लस्टर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर, कळवा प्रभाग समतिीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे निवडणुक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेत बदली झालेले सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना कळवा प्रभाग समिती देण्यात आली आहे. त्यानुसार ते आता प्रभाग समितीत हजर झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे या सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त पदभारासह सोपविण्यात आलेल्या विभागांचा कार्यभार तात्काळ स्विकारु न अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले होते. मात्र ते हजर न झाल्याने पुढील २४ तासात हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
मात्र तरी देखील हे दोघेही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता पालिकेकडून पुढील पावले उचलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यासाठी पालिका आता राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून झालेल्या कामाची माहिती देखील त्यात दिली जाणार असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारसही केली जाणार असल्याची माहिती सुत्रंनी दिली. दुसरीकडे या दोनही सहाय्यक आयुक्तांनी आता आपल्याकडे पूर्वीचीच प्रभाग समिती राहावी या उद्देशाने राजकीय मंडळींकडे जोडे ङिाजविण्यास सुरवात केली असून त्यांच्याकडून आपल्याला हवी असलेली प्रभाग समिती मिळू शकते असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते बदलीच्या ठिकाणी हजर राहत नसल्याचे दिसून आले आहे.
संबधींत दोनही सहाय्यक आयुक्त आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात आयुक्तांबरोबर चर्चा करुन शासनाकडे परत पाठविण्यासाठी पत्र व्यवहार केला जाणार आहे. - संजय हेरवाडे - अतिरिक्त आयुक्त, ठामपा