‘त्या’ अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरहजेरी गरिबांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:01 AM2020-08-12T00:01:28+5:302020-08-12T00:01:41+5:30

डॉक्टर, परिचारिकांची अनुपस्थिती; मुख्यालयी न राहणाऱ्यांवर होणार कारवाई

The absence of 'those' officers and employees on the lives of the poor | ‘त्या’ अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरहजेरी गरिबांच्या जीवावर

‘त्या’ अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरहजेरी गरिबांच्या जीवावर

Next

- हितेन नाईक 

पालघर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि उपकेंद्रात सुसज्ज निवासस्थाने निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असताना तसेच कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आले आहे. डॉक्टर, परिचारिकांच्या गैरहजेरीचा फटका गरीब रुग्णांना बसत असल्यामुळे संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे प्रथम सर्वांनी मुख्यालयी राहण्याबाबत अंमलबजावणी करावी आणि नंतरच आरोग्य समितीची सभा लावावी, असे आदेश उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती नीलेश सांबरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

जिल्ह्यात एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३१२ उपकेंद्रे आहेत. जि.प.अंतर्गत एकूण १४ लाख २८ हजार ६७८ लोकसंख्येला आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. दररोज साधारणपणे आरोग्य केंद्रात ५० हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी नोंद करीत आहेत. जि.प.च्या आरोग्य विभागांतर्गत एकूण १७१२ मंजूर पदांपैकी १२१५ पदे भरण्यात आली असून ४९७ पदे रिक्त आहेत. त्यापैकी सहाय्यक जिल्हा अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पुरुष व महिला आरोग्य सेवक, स्त्री परिचर आदी रुग्णसेवेशी निगडित पदांचा समावेश आहे. त्यामुळे या रिक्त पदांचा मोठा परिणाम विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आदी ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णसेवेवर होत असल्याने उपचाराविना अनेक रुग्णांचे मृत्यू होत असतात. त्यामुळे सर्वांनी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र गैरहजर राहणाºया अधिकारी-कर्मचाºयांमुळे गरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने इथल्या रुग्णांना नाईलाजाने गुजरात आणि सिल्वासा येथे जाऊन उपचार करून घ्यावे लागत आहेत.

राज्य आणि केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना जि.प.मार्फ$त राबविण्यात येत आहेत. या सेवा राज्यातील जनतेला विशेषत: ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जि.प.मध्ये नियुक्त केल्या जाणाºया वर्ग क्र. ३ च्या कर्मचाºयांना देण्यात येणाºया सेवा लक्षात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार कर्मचाºयांनी मुख्यालयी राहण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुख्यालयी राहण्यासाठी २० कोटींचा खर्च त्यांच्या निवासस्थानांची उभारणी आणि दुरुस्तीसाठी करण्यात आलेला आहे. अशा वेळी सूर्यमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी नेहमीच गैरहजर तर परिचारिका खोडाळा येथे कार्यरत आहेत. त्यातच कारेगाव प्राथमिक केंद्रातील परिचारिका कुठलाही रजेचा अर्ज न देता गैरहजर आहेत. भोपोली, सवादे, गडदे, शेवते व आलोंडा उपकेंद्रांमध्ये परिचारिका राहात नसल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे उपाध्यक्ष सांबरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या निदर्शनास पत्रान्वये आणून दिले आहे.

तत्काळ हजर राहण्याचे आदेश द्या, नंतरच आरोग्य समितीची सभा घ्या
जिल्ह्यात सध्या कोविड, कुपोषण, सर्पदंश, साथीचे आजार याचे प्रमाण वाढू लागल्याने ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे अत्यावश्यक असताना त्यांची गैरहजेरी गरीब रुग्णांच्या जीवितास धोका उत्पन्न करू शकते. त्यामुळे आपल्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाºयांना तत्काळ मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश द्यावेत. नंतरच आरोग्य सेवेची सभा घेण्यात येईल, असे कळवून मंगळवारी आयोजित सभा रद्द करण्याचे पत्र उपाध्यक्षांनी जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. दयानंद सूर्यवंशी यांना पाठविले आहे.

Web Title: The absence of 'those' officers and employees on the lives of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.