ठाण्यातील येऊर मध्ये हॉटेल,बंगल्याना मुबलक पाणी ; मात्र आदिवासी पाडे पाण्याच्या टंचाईमुळे व्याकुळ
By रणजीत इंगळे | Published: May 29, 2023 07:01 PM2023-05-29T19:01:40+5:302023-05-29T19:02:19+5:30
तब्ब्ल ९ दिवसांनी पाण्याचा टँकर येतो गावात
रणजीत इंगळे, ठाणे: स्मार्ट सिटी म्हणून ठाण्याची ओळख आहे. हजारो कोटी रुपयांच्या विकास कामाची घोषणा ही नेहमी होत असते. दुसरीकडे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या येऊर भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागत आहे. मुंबई आणि ठाण्याचा ऑक्सिजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरमध्ये पिण्याच्या पाण्याची ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तब्बल आठ दिवसानंतर पाण्याचा टँकर गावांमध्ये येत असल्याच नागरिक सांगतात. येऊन मध्ये अनधिकृत हॉटेल, बंगले यांना मात्र नियमित पाण्याचा पुरवठा होतो. एवढंच नाहीतर बंगल्यामध्ये गार्डन आणि रस्त्यावर देखील पाण्याचा फवारा मारतात पण आदिवासी बांधवाना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४०० हून अधिक दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहराचे गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरिककरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत होता.
अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणी देण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेला भातसा धरणातून वाढीव पाणी दिले आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेनेही शहराला वाढीव पाणी मंजुर केले. यामुळे शहरात आता दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागांत टंचाईची समस्या निर्माण होते. त्यापाठोपाठ डोंगर भागात असलेल्या येऊर मधील आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे. येऊर भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. पाटनोपाडा, जांभूळपाडा,धर्माचापाडा,देवाचा पाडा, वणीचापाडा या अनेक आदिवासीं पाड्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
"गेली ८ दिवस पाणी आलेच नाही. उन्हातान्हत पाण्यासाठी फिरावे लागत आहे. गेली आठवडाभर कोणाच्या घरात अंघोळ केली नाही. पाणी नसल्याने पाहुणे पण बोलवता येत नाही. सद्या लग्नसराईचे दिवस असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.. - राधिका सालकर ( आदिवासी ग्रामस्थ)
आम्ही स्थानिक असून पाण्यासाठी आम्हाला दुसऱ्याच्या दारात जावे लागत आहे. कुठलेतरी हॉटेल, ढाबे किंवा एखाद्या बंगल्याच्या मालकांना पिण्याच्या पाण्यासाठी विनवणी करावी लागते. त्यामूळे पालिका प्रशासनाने कमीत कमी पाण्याची सोय करावी आणि दररोज टँकर पाठवावा अशी मागणी आम्ही करत आहोत. - सुनील सुलकर ( आदिवासी ग्रामस्थ )