महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन: पोलीस निरीक्षकाला दोन महिने कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 09:45 PM2019-02-27T21:45:50+5:302019-02-27T21:55:26+5:30

एका महिला सहकारी कर्मचा-याबरोबर गैरवर्तन करीत तिची लैंगिक छळवणूक करणा-या कापूरबावडी पोलीस ठाण्याचा तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मसाजी काळे याला ठाणे न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने ठाणे वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Abuse of female employees: Two-month jail sentence for the police inspector | महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन: पोलीस निरीक्षकाला दोन महिने कारावासाची शिक्षा

नऊ वर्षांनी मिळाला न्याय

Next
ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णयखोटया आरोपांमुळे महिला कर्मचाऱ्याला केले होते निलंबित नऊ वर्षांनी मिळाला न्याय

ठाणे : सहकारी महिला कर्मचा-याशी गैरवर्तन केल्याबद्दल कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांना ठाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. झा यांनी सोमवारी दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
काळे हे २००९ मध्ये ठाणे आयुक्तालयात कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका सहकारी महिलेची लैंगिक छळवणूक केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी न्या. झा यांच्या न्यायालयात झाली. आपल्याशी लगट करण्याचा प्रकार काळे यांनी केल्याची तक्रार पीडित कर्मचारी महिलेने केली होती. त्यांनी तिची अनुपस्थिती लावून तिच्याविरुद्ध पोलीस डायरीमध्ये शेराही मारला होता. घटनेच्या एक महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून तिने काळे यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसेच आयुक्तालयातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तिने दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला कोणीही दाद दिली नाही. आपल्याविरुद्ध तक्र ार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच काळे यांनी तिच्याविरुद्ध पोलीस उपायुक्तांकडे रिपोर्ट पाठवला. त्यामुळे तिला एप्रिल २०११ मध्ये सेवेतून निलंबित करण्यात आले. सतत दोन वर्षे त्रास सहन केल्यावर पुन्हा निलंबनाचीही कारवाई झाल्याने या महिला पोलीस कॉन्स्टेबलने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर, याप्रकरणी चौकशीचे आदेश देत न्यायालयाने विशाखा समितीच्या अध्यक्षा व तत्कालीन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे ही चौकशी सोपवली. करंदीकर यांनी चौकशी करुन २०१२ मध्ये ठाणे प्रथम वर्ग न्यायालयात काळे यांच्याविरुद्ध भादंविच्या ५०९ आणि विनयभंगाच्या कलम ३५४ सह आरोपपत्र दाखल केले. याबाबतची सुनावणी सुरू झाल्यानंतरही आरोपी काळे यांनी या महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खोटे आरोप करून तिचे निलंबन झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर तिला पुन्हा सेवेत घेण्यात आले. काळे हे अनेक सुनावणींना गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. या सर्व बाबी सहायक सरकारी वकील रश्मी क्षीरसागर यांनी न्यायालयात मांडून जोरदार युक्तिवाद केला. आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली. मात्र, आरोपीचे वकील रवी कामत यांनी तिच्या निलंबनामुळेच ती खोटेनाटे आरोप करीत असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. झा यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी काळे यांना दोषी ठरवत कलम ५०९ अन्वये दोन महिन्यांच्या कारावासाची तसेच १० हजारांच्या दंडाचीही शिक्षा ठोठावली. दहा हजारांमधील पाच हजार रुपये पीडित कर्मचारी महिलेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

 

Web Title: Abuse of female employees: Two-month jail sentence for the police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.