अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पेणमधून अटक
By जितेंद्र कालेकर | Published: April 1, 2024 09:22 PM2024-04-01T21:22:44+5:302024-04-01T21:23:16+5:30
ठाणे खंडणीविरोधी पकाची कारवाई : पोलिस कोठडीत रवानगी.
ठाणे : ठाण्यातील १५ वर्षीय मुलीला फूस लावून उत्तर प्रदेशात पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरहान उमर फैजल खान (२०, रा. शकरी कुहिया, बलरामपूर, उत्तर प्रदेश) याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याला डायघर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाने सोमवारी दिली.
डायघर भागातील अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावून फरहान याने ऑगस्ट २०२३ मध्ये उत्तर प्रदेशात पळवून नेले होते. तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात आधी अपहरणाचा गुन्हा ऑगस्ट २०२३ मध्ये दाखल झाला होता. या गुन्ह्याचा डायघर पोलिसांसमवेत गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही समांतर तपास सुरू होता. या मुलीचा डायघर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून शोध घेतला होता.
तिच्यावरील अत्याचाराचा प्रकार उघड झाल्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल झाला हाेता. यातील आरोपी गेली आठ महिने ठाणे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या शोधासाठी ठाणे पाेलिसांचे पथक उत्तर प्रदेशातही गेले होते. मात्र, तो मिळाला नव्हता. तो आपला ठावठिकाणा, मोबाइल क्रमांक बदली करून ओळख लपवून रायगड जिल्ह्यातील पेणजवळील वडखळ भागात वास्तव्य करीत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक भूषण कापडणीस यांना मिळाली होती. त्याच आधारे वडखळ येथील जेएसडब्लू कंपनी परिसरातून २९ मार्चला त्याला ताब्यात घेतले. त्याला डायघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.