कळंबोलीत पाण्याचा गैरवापर
By Admin | Published: October 29, 2015 11:18 PM2015-10-29T23:18:32+5:302015-10-29T23:18:32+5:30
कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.
तळोजा : कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.
एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. मुळात म्हणजे एका घरामागे एक पाण्याचे कनेक्शन असताना परिसरातील रहिवासी या कनेक्शनला १ एचपी, २ एचपीच्या मोटारी लावून पाणी वापरत आहेत. यामुळे घराच्या वर असलेल्या ३ मजल्यापर्यंत पाणी पुरवणे सोपे होते. गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरु असून यामुळे पाण्याचा गैरवापर होत आहे.
शिवाय या ठिकाणाप्रमाणे कळंबोलीत काही ठिकाणी पाण्याच्या जोडणीला मीटर नसल्याने सिडकोकडून किरकोळ रुपयात पाणी मिळायचे. मात्र आता उशिरा का होईना प्रशासनाला शहाणपण सुचलेले आहे. या प्रकरणी सिडकोचे संजय भाटिया यांच्याकडे कळंबोली शहरातील या भागांचा लेखाजोखा पाणीपुरवठा विभागाने मांडला असून यावर लवकरच अंमलबजावणी होणार आहे. कळंबोली परिसरातील एलआयजी, केएल १, केएल २ या भागात सुमारे ६५ हजार लोकवस्ती असून यातील एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे मजले दिवसेंदिवस चढत आहेत, त्यामुळे या परिसरात सिडकोला गरजेपेक्षा अधिक पाणी द्यावे लागत आहे. त्या शिवाय पाणी ओढण्यासाठी मोटारीची स्पर्धा येथे लागत आहे.
सिडकोच्या जलवाहिनीतला दाब कमी असल्याने या लोकांना त्याची गरज लागत आहे, मात्र आता या परिसराला मुबलक पाणी पुरवण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाणार असून पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)