अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दहा वर्षांचा सश्रम कारावास, ठाणे न्यायालयाचा निर्णय
By जितेंद्र कालेकर | Published: April 8, 2024 07:39 PM2024-04-08T19:39:42+5:302024-04-08T19:40:55+5:30
आरोपी शिवाजी याने घराची कडी उघडून तिच्या मुलीला त्याच्या घराच्या पोटमाळयावर नेले.
ठाणे: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिवाजी धाडवे (२४, रा. किसननगर, ठाणे) या आरोपीला ठाणे न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा साेमवारी ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाचीही शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. किसननगर भागातील तक्रारदार महिला १० ऑक्टाेबर २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या चार वर्षीय मुलगी आणि दीड वर्षीय मुलाला घरात ठेवून दरवाजा बंद करुन भाजी आणण्यासाठी गेली होती.
त्याचवेळी यातील आरोपी शिवाजी याने घराची कडी उघडून तिच्या मुलीला त्याच्या घराच्या पोटमाळयावर नेले. तिथे तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कारासह लैंगिक अपराधापासून बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला हाेता. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी आरोपीला त्याच दिवशी रात्री ११ वाजता अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी ८ एप्रिल २०२४ रोजी ठाण्याचे पोस्कोचे विशेष न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली. सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. पवार यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले.
विशेष सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व बाजू पडताळून आरोपीला दोषी ठरवून दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार शेलार यांनी काम पाहिले. आराेपीने दंडाची रक्कम भरल्यास ती पिडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.