अल्पवयीन मुलींवर अत्याचार, शाळेच्या सुरक्षा रक्षकाला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By अजित मांडके | Published: September 25, 2023 05:07 PM2023-09-25T17:07:51+5:302023-09-25T17:08:04+5:30
ठाणे न्यायालयाचा निकाल
ठाणे : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकास शंकर चव्हाण(३५) या नराधम ठाणे महापालिकेच्या शाळेवरील सुरक्षारक्षकाला ठाणे अतिरिक्त जिल्हा ( विशेष पोस्को) न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांनी सोमवारी दोषी ठरवत, ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली अशी माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी दिली. ही घटना कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्ट २०१६ रोजी घडली होती.
आरोपी विकास हा कोपरी गाव येथील ठाणे महानगरपालिका शाळा नं. १६ या शाळेचा सुरक्षारक्षक आहे. सध्या त्याला निलंबित करण्यात आलेले आहे. त्याने त्या शाळेत शिकणाऱ्या दहा वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरी पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर हा खटला न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांच्यासमोर सुनावली आला.
यावेळी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी ११ साक्षीदार तपासले. तसेच सुनावणी दरम्यान सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी विकास याला ५ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास शंभर दिवस साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एम डी जाधव यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई सुशील डोके यांनी काम पाहिले.