शैक्षणिक भूखंड बाजारभावानेच
By admin | Published: April 22, 2016 01:58 AM2016-04-22T01:58:05+5:302016-04-22T01:58:05+5:30
ठाणे महापालिकेने बुधवारी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंड बाजारभावाने देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजुरीकरिता आणल्याने यापूर्वी विविध संस्थांना दिलेले
ठाणे : ठाणे महापालिकेने बुधवारी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंड बाजारभावाने देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजुरीकरिता आणल्याने यापूर्वी विविध संस्थांना दिलेले शैक्षणिक भूखंडही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतेक भूखंड हे ठाण्यातील काही बड्या राजकीय नेत्यांनीच आपल्या संस्थेसाठी घेतल्याने आता त्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील बैठकीत या बड्या नेत्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बुधवारी झालेल्या महासभेत शहरातील आरक्षित भूखंड खाजगी विकासकाला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला होता. या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि भाजपाचे मिलिंद पाटणकर यांनी महापालिका प्रशासनाने आणलेल्या या धोरणाचे स्वागत करून ही भाडेआकारणी विकसित केलेल्या इमारतींवर केली, तर महापालिकेस जास्त उत्पन्न मिळेल, असा मुद्दा या वेळी उपस्थित करून पालिका प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वी दिलेल्या शैक्षणिक भूखंडाचा मुद्दा उपस्थित करून हे भूखंडदेखील भाडेतत्त्वावर दिल्यास महापालिकेस दहापट जास्त नफा होईल, असा विश्वास व्यक्त केला. शैक्षणिक भूखंड ज्या संस्थांना देण्यात येणार आहेत, तसेच महापालिकेने अंतिम करार केला नाही, त्यामुळे या धोरणानुसार शैक्षणिक भूखंड त्या संस्थांना देता येतील, असा दावा केला. परंतु, आयुक्तांच्या या मताला महापौर संजय मोरे यांनी विरोध दर्शवला. महासभेने यापूर्वीच ठराव मंजूर करून या संस्थांना भूखंड विकसित करण्यास दिले आहेत. त्यामुळे हे धोरण त्यास लागू करता येणार नसल्याचे सांगितले. परंतु, शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी शैक्षणिक भूखंड देण्याचा ठराव तीन महिन्यांपूर्वी झाला आहे. तो ठराव आता बदलता येऊ शकतो. महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव सादर केल्यास भाडेतत्त्वावर शैक्षणिक संस्थांना भूखंड देण्यास हरकत नाही, असे सांगितले. या नव्या धोरणाचा सविस्तर अभ्यास करण्याचे सांगून हा प्रस्ताव पुढच्या बैठकीत चर्चा करण्याचे कारण सांगत तो तहकूब करण्यात आला. पालिकेचे सहा शैक्षणिक भूखंड ठाण्यातील विविध राजकीय पक्षांच्या संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे या भूखंडांवरून ठामपातील राजकीय मंडळी पुढच्या बैठकीत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)