सिद्धगडच्या विकासाची कामे वेगाने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:33+5:302021-09-18T04:42:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडच्या विकासाच्या आशा आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडच्या विकासाच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सिद्धगडाच्या विकासाची कामे वेगाने करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे २ जानेवारीला हुतात्मादिनी रस्त्यासह काही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिद्धगड स्मारकाचा विकास आणि तेथील सुविधांबाबत बुधवारी पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या वेळी भाजपचे आमदार किसन कथोरे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
सिद्धगड स्मारक आणि जांभुर्डे ते स्मारकापर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीला हरकत नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. त्यानंतर पाटील यांनी स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्याची सूचना केली. त्यालाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. हा प्रस्ताव चार वर्षांपासून पडून असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
सिद्धगड स्मारकाच्या विकासासह लोकांच्या पुनर्वसनाचे काम तातडीने करण्याची मागणी कथोरे यांनी केली. या बैठकीत स्मारक व स्मारकाचा परिसर विकसित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना वन विभागाला करण्यात आली. स्मारक विकास व रस्त्याची कामे फास्ट ट्रॅकवर करावीत. २ जानेवारीच्या हुतात्मा दिनी नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असे आदेश पाटील यांनी दिले.
यशवंतराव चव्हाण यांनी दिली होती भेट
१९८० पूर्वी स्मारक अस्तित्त्वात असल्याचे पुरावे देण्याचे सुचविण्यात आले आहे. मात्र, १९४७ मध्ये स्मारक उभारले होते. याठिकाणी १९७७ मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे हेलिकॉप्टरने हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आले होते. त्यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत या ठिकाणी रस्ता तयार केला होता, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
---------------