स्वीकृतसाठी शिवसेनेचा निष्ठावंतांना न्याय
By admin | Published: April 16, 2017 04:28 AM2017-04-16T04:28:42+5:302017-04-16T04:28:42+5:30
ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंतांना पदे देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्याचेच निश्चित केले आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंतांना पदे देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्याचेच निश्चित केले आहे. महापौरपद निष्ठावान शिवसैनिकाला दिल्यानंतर आता पुन्हा स्वीकृतपदासाठीदेखील तिघा निष्ठावंतांना संधी दिली आहे. भाजपाकडून अपेक्षेप्रमाणे शहराध्यक्ष संदीप लेले आणि राष्ट्रवादीकडून मनोहर साळवी यांनी शनिवारी महापालिकेकडे गटनेत्यांचे पत्र सादर केले. या पाच जणांची निवड येत्या २० एप्रिलच्या महासभेत होणार आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादीचे ३४, भाजपाचे २३, काँग्रेस ३, एमआयएम २, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. त्यानुसार, आता मागच्या दाराने प्रवेश करण्यासाठी शिवसेनेकडून तिघे, तर राष्ट्रवादी व भाजपाकडून एक जण पालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहे. त्यानुसार, शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे पुन्हा निष्ठावंतांना न्याय दिला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेले कळव्यातील राजेंद्र साप्ते, वागळे पट्ट्यातील दशरथ पालांडे आणि शहरप्रमुख रमेश वैती यांचे पुत्र जयेश वैती यांना संधी दिली आहे. सुरुवातीपासून वैती आणि राजेंद्र यांची नावे अंतिम मानली जात होती. परंतु, तिसऱ्या नावावरून बऱ्याच जणांनी श्रेष्ठींकडे तगादा लावला होता. अखेर, श्रेष्ठींनी तिसऱ्या जागीदेखील निष्ठावान शिवसैनिकालाच संधी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतून सुरुवातीला अमित सरय्या यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, त्यांचे नाव पिछाडीवर पडल्यानंतर कळव्यातून मनोहर साळवी यांनी शनिवारी स्वीकृतसाठी अर्ज सादर केला. दुसरीकडे भाजपामधूनदेखील एकमेव शहराध्यक्ष संदीप लेले यांच्याच नावाची चर्चा मागील काही दिवस सुरू होती. त्यांच्या नावाला त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या गटाने विरोध केला असून त्यांच्याविरोधात सह्यांची मोहीम घेऊन त्यांना हे पद मिळू नये, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. (प्रतिनिधी)
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पक्षाने दुसऱ्या गटाची ही मोहीम मोडीत काढून अपेक्षेप्रमाणे लेले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार, या सर्वांची निवड २० एप्रिलच्या महासभेत होणार आहे. लेले यांच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून येणार असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.