स्वीकृत सदस्य निवड : भिवंडीमध्ये घोडेबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:38 AM2018-04-16T06:38:18+5:302018-04-16T06:38:18+5:30
महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांसाठी सर्व पक्षांत चढाओढ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी घोडेबाजारास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून शनिवारी या अर्जांची आयुक्त मनोहर हिरे यांनी गटनेत्यांच्या उपस्थितीत छाननी केली.
भिवंडी - महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांसाठी सर्व पक्षांत चढाओढ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी घोडेबाजारास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून शनिवारी या अर्जांची आयुक्त मनोहर हिरे यांनी गटनेत्यांच्या उपस्थितीत छाननी केली.
पालिकेत एकूण ९० नगरसेवक निवडून आले असून पक्षीय बलानुसार काँग्रेसने तीन, शिवसेना एक व भाजपा एक अशी पाच स्वीकृत सदस्यांची शिफारस नगरसेवकांना करायची आहे. वास्तविक, नियमानुसार माजी सेवानिवृत्त अधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, उच्च अभियांत्रिकी, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीची शिफारस करणे अपेक्षित आहे. परंतु, काही वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी किंवा घोडेबाजाराने स्वीकृत सदस्यांची निवड होत असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी पालिकेतील पाच स्वीकृत सदस्यांसाठी जयंत घुले, हर्षल पाटील, कृष्णा गाजेंगी, डॉ. नुरुद्दीन निजामुद्दीन अन्सारी, मधुकर जगताप, शरद भसाळे, जावेद एफ. आझमी, डॉ.मो. आसीफ युनूस फारुखी, देवानंद थळे, मोह. साजीद अश्फाक खान, सिद्धेश्वर कामूर्ती,राहुल खटके अशा १२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.
या उमेदवारांच्या अर्जांची शनिवारी आयुक्त हिरे यांच्या दालनात छाननी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल शिवसेना गटनेते संजय म्हात्रे, काँग्रेस गटनेते हालीम अन्सारी, सभागृह नेते प्रशांत लाड, भाजपा गटनेते निलेश चौधरी आणि नगरसचिव बिपिन सापटे उपस्थित होते.
दरम्यान, या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागलेले आहे. पक्षांकडून रणनिती आखणे सुरू आहे.
शहराबाहेरील उमेदवारांची अडचण
यावेळी सरकारी नियमानुसार स्थानिक उमेदवारांच्या वर्गवारीप्रमाणे सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अग्रवाल यांनी आयुक्तांकडे केली. त्यामुळे शहराबाहेरील उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे.
शिवसेनेने शहराबाहेरील उमेदवार दिल्याने शहरातील शिवसैनिकांनी याआधीच नाराजी व्यक्त केली होती. तर, काँग्रेसच्या जुन्या व अनुभवी उमेदवारांना संधी न देता नुकत्याच काँगे्रसमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवारांना स्वीकृत सदस्यासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे शहरातील जुन्याजाणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या स्वीकृत सदस्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.