स्वीकृत सदस्यांचा ठराव घाईत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:44 AM2018-07-15T02:44:58+5:302018-07-15T02:45:06+5:30

महापालिकेत काँग्रेस-सेना सत्तास्थापनेचे वर्ष उलटल्यानंतर गुरूवारी झालेल्या महासभेत घाईघाईत पाच नामनिर्देश सदस्यांसाठी ठराव झाला.

Accepted Members' Resolution Accelerated | स्वीकृत सदस्यांचा ठराव घाईत मंजूर

स्वीकृत सदस्यांचा ठराव घाईत मंजूर

Next

भिवंडी : महापालिकेत काँग्रेस-सेना सत्तास्थापनेचे वर्ष उलटल्यानंतर गुरूवारी झालेल्या महासभेत घाईघाईत पाच नामनिर्देश सदस्यांसाठी ठराव झाला. सरकारी नियमांची पायमल्ली करून महापौरांनी हा ठराव घेतल्याचा आरोप करत भाजपा सदस्यांनी या ठरावास विरोध केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.
भिवंडी महापालिकेत पाच नामनिर्देशित स्वीकृत सदस्य निवडीसाठी सर्वसाधारण विशेष महासभा महापौर जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगरसेवकांच्या गटानुसार काँग्रेसला तीन, शिवसेनेला एक व भाजपास एक असे एकूण पाच स्विकृत सदस्य निवड करण्यासाठी नगरसचिवांनी कळवले होते. सरकारी नियमानुसार नामनिर्देश सदस्यांसाठी विधी ,वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, सनदी अधिकारी किंवा लेखापाल, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती निवडून देणे अपेक्षित आहे. त्यासाठी एक वकील, दोन डॉक्टर व इतर समाजसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी भाजपाने वकील हर्षल पाटील यांची सदस्य म्हणून शिफारस केली. तर शिवसेनेने ग्रामीण भागातील देवानंद थळे यांचे नाव सुचवले. तर काँग्रेस नगरसेवकांनी सिध्देश्वर कामुर्ती, राहुल पाटील व मोह. साजिद अश्फाक खान यांची शिफारस केली. या पाचजणांची नामनिर्देश सदस्य म्हणून नेमणुकीसाठी महापौरांनी घाईघाईने ठराव घेत मंजूर केला.
ठराव घेण्याअगोदर नगरसचिव प्रस्तावना वाचत असताना सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालत बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला. तसेच सरकारी नियम डावलून हा ठराव घेतल्याचा आरोप करत विरोधा पक्षनेते श्याम अग्रवाल यांच्यासह भाजपा नगरसेवकांनी ठरावास विरोध केला.
तसेच ठराव घेण्यापूर्वी आयुक्तांनी उमेदवारांची चौकशी करून नामनिर्देश सदस्यासाठी पात्र सदस्यांच्या शिफारशीची माहिती महापौरांनी दिली होती. परंतु ती शिफारस डावलून स्विकृत सदस्यांची निवड झाली.
>कादगपत्रांची पडताळणी करा
पात्र डॉक्टर उमेदवारांची निवड न केल्याने काँग्रसचे सुजाऊद्दीन अन्सारी व तारीक फारूकी हे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. तर निवडून आलेल्या सदस्यांच्या दाखल कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी भाजपा नगरसेवक प्रकाश टावरे यांनी केली. या सर्व गोंधळामुळे नामनिर्देशन स्विकृत उमेदवारांची निवड वादळी ठरली आहे.

Web Title: Accepted Members' Resolution Accelerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.