कौतुकास्पद! वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीचे पितृत्व स्वीकारलं अन् लग्न लावून दिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:32 PM2020-07-29T17:32:37+5:302020-07-29T17:33:23+5:30
दरम्यान हाताला काम नसल्याने लग्नासाठी जमा केलेली पुंजी संपून गेली. अशावेळी मुलीचे लग्न कसे लावून द्यावे, अशी चिंता कुटुंबाला पडली.
उल्हासनगर : वडिलाचे छत्र हरविलेल्या मुलीचे राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पितृत्व स्वीकारून ऐन कोरोना संकटात लग्न लावून दिले. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी संसार उपयोगी भांडीकुंडी व रोख रक्कम देऊन तिच्या संसाराला हातभार लावला आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर येथे राहणाऱ्या रेणुकाचे पुणे औंध येथील मुलासोबत लग्न जुळले होते. घरात लग्नाची तयारी सुरू असताना कोरोना संकट आले. दरम्यान हाताला काम नसल्याने लग्नासाठी जमा केलेली पुंजी संपून गेली. अशावेळी मुलीचे लग्न कसे लावून द्यावे, अशी चिंता कुटुंबाला पडली.
याबाबतची माहिती पक्षाचे डॉ. कैलाश मोनावडे यांना मिळाली. त्यांनी पक्षाचे गटनेते व प्रदेश सचिव भरत गंगोत्री यांना याबाबत माहिती दिल्यावर गंगोत्री यांनी मुलीचे पितृत्व स्वीकारून कन्यादान करण्याची तयारी दर्शविली. मुलीसह कुटुंबाला पुणे औंध येथील हॉलमध्ये मंगळवारी नेऊन मोठ्या उत्सवात लग्न लावून दिले. यावेळी पक्षाच्या शहराध्यक्ष किरण कौर धामी, डॉ. नितीन कोकरे, रोशन सोलानकर, विकास खरात, माधव बगाडे, कन्हा निकांबे आदी जण उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाने वडिलाचे छत्र हरविलेल्या व कोरोना संकटात गरीब मुलीचे लग्न लावून देऊन शहरात नवा आदर्श निर्माण केला आहे. तसेच मुलीला संसारोपयोगी लागणारी भांडीकुंडी व रोख रक्कम दिली. राष्ट्रवादी पक्षाने उचललेल्या पावलाचे कौतुक होत असून अशा गरीब नागरिकांना मदत करण्याचे आवाहनही गंगोत्री यांनी केली आहे.