शिव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 11:37 PM2019-03-02T23:37:31+5:302019-03-02T23:37:36+5:30
प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होते.
अंबरनाथ : प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होते. शेकडो भाविक हे महादेवाच्या दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहतात. त्यातच, दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी भाविकांना वेळ लागत असल्याने यंदाच्या महाशिवरात्रीत दर्शनरांगेतील भाविकांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारातूनच दर्शन घेण्याबाबत पोलीस प्रशासन विचार करत आहेत. गर्दीवर नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी हा प्रयोग केला जाणार आहे. यासंदर्भात मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात अंतिम चर्चा सुरू आहे.
शिव मंदिरात महाशिवरात्रीला होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने आता काही प्रमाणात कठोर निर्णय घेण्याचे काम सुरू केले आहे. शिव मंदिराचा मार्ग एकदिशा करण्यात आला आहे. तर, मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता ही गर्दी लवकर पुढे सरकावी, यासाठी भाविकांना मंदिराच्या गाभाºयात न पाठवता प्रवेशद्वाराजवळूनच दर्शन घेण्याची सोय करण्यासाठी पोलीस आणि मंदिर प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. सुरुवातीला मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यास विरोध केला होता. मात्र, भाविकांनाही गाभाºयात उतरताना आणि चढताना त्रास होत असल्याने पोलिसांनी वस्तुस्थितीची जाणीव करून दिल्यावर आता यासंदर्भात चर्चा सुरू करण्यात आली आहे.
गाभाºयात जाण्यासाठी असलेला मार्ग हा अत्यंत अरुंद असल्याने भाविकांना सहा ते दहा तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन किमान शिवरात्रीसाठी भाविकांना गाभाºयातून दर्शन न देता प्रवेशद्वारातूनच दर्शन द्यावे, अशी विनंती केली आहे. त्यावर एकवाक्यता अजूनही झालेली नसली, तरी योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
दुसरीकडे देशातील तणावपूर्ण वातावरणामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव दलाचे पथक, एक सहायक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक, २५० कर्मचारी, ७० महिला पोलीस, १५० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे.
तसेच भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य पथक, वीज यंत्रणा, फायर यंत्रणा, दुर्बीणधारी टॉवर, सीसीटीव्ही, छेडछाडविरोधी पथक, साध्या वेशातील पोलीस, श्वान पथक, पोलीसमित्र आणि स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते भाविकांच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहणार आहेत. दर्शनासाठी जिल्हा आणि बाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने येतात.
>मंदिर झळकले
मंदिर परिसरात मनोरंजनाचे कार्यक्रम आणि पाळणे यांच्यासाठी काही अंतरावर सोय करण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अग्निशमनविरोधी यंत्रणा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यात्रेच्या मार्गावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त राहणार आहे. मंदिराच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.