कल्याणमध्ये शिवाजी चौकात "त्याच" जागी पुन्हा अपघात; बसखाली येऊन महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 09:53 PM2018-07-07T21:53:28+5:302018-07-07T21:54:36+5:30
उंचसखल रस्त्याने घेतला ४० वर्षीय महिलेचा बळी; घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याण - जवळपास महिनाभरपूर्वी शिवाजी चौक परिसरात उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला महिना उलटत नाही तोवर पुन्हा एकदा याच रस्त्यावर त्याच ठिकाणी दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकीव मागे बसलेली महिला रस्त्यावर पडून बस खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. मनीषा भोईर (वय - ४०) असे या मयत महिलेचे नाव असून ती चिकन घर परिसर राहणारी होती. ती कल्याणमधील एका खाजगी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होती. तिच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा व पती असा परिवार आहे. शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान रस्त्यांच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये लेव्हलिंग न करण्यात आल्याने रस्ते वरखाली झाले आहेत. नागरिकांच्या जीवावर उठलेल्या अशा रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
शिवाजी चौकात महिनाभरापूर्वी दुचाकी घसरून पडली. यामुळे झालेल्या अपघातात आई - वडिलाबरोबर दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास मनीषा भोईर ही महिला एका इसमसाह दुचाकीने शाळेतून घराच्या दिशेने शिवाजी चौकातून जात असताना केम्ब्रिज दुकानासमोरील उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरली आणि पाठीमागे बसलेल्या मनीषा भोईर रस्त्यावर पडल्या आणि बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्या. या दुर्दैवी अपघातात जखमीं झालेल्या भोईर यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,तिचा मृत्यू झाला. ही घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी शिवाजी शहा यांनी मी दुकानाच्या बाहेर उभा असताना हि घटना बघितली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.