चुकीच्या दुभाजकामुळे होताहेत अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:04 AM2019-11-06T00:04:36+5:302019-11-06T00:05:05+5:30
वाहनांचे नुकसान : संबंधित यंत्रणेने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी
डोंबिवली : पूर्वेतील पेंढरकर महाविद्यालय रोडवर रोटरी उद्यानासमोर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. दर एक-दोन दिवसांच्या फरकाने याठिकाणी अपघात होत आहेत. दुभाजकाची रचना योग्यप्रकारे नसल्याने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
डोंबिवली शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांमध्ये या रस्त्याची गणना होत असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या रस्त्यावर लहान मुलांचे खेळण्याचे उद्यान असल्याने दुभाजक बांधण्यात आला असला तरी त्याच्यावर वाहने आदळून अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ज्या रस्त्यावर हा दुभाजक आहे, तो केडीएमसीच्या हद्दीत असला तरी त्याची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) आहे. संबंधित दुभाजक बांधताना तो योग्य प्रकारे बांधला गेलेला नाही. त्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत असून तो केवळ रोटरी उद्यानासमोरील भागापर्यंतच सीमित ठेवण्यात आला आहे. दुभाजक पेंढरकर महाविद्यालयापर्यंत असायला हवा होता, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर पथदिव्यांची सुविधा आहे, पण रात्री येथे सदैव अंधाराचे साम्राज्य असते. यात दुभाजक दिसत नाही. त्यामुळे वाहने दुभाजकावर आदळण्याचे प्रकार घडत आहेत. काही वाहने तर दुभाजकावर चढल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, सातत्याने घडणारे अपघात पाहता काही महिन्यांपूर्वी ज्याठिकाणी वाहने आदळतात तेथे धोकादायक सूची लावली गेली होती. पण ती गायब झाल्याने पुन्हा अपघात वाढले आहेत. या परिसरात छोटी हॉटेल्स आहेत, तसेच सायंकाळी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लागतात. या परिसरात संध्याकाळी वाहनांची वर्दळ असते. येथे महाविद्यालय असून एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे मुख्य कार्यालयही आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. बांधकाम विभागाच्या कल्याण येथील कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
...अन्यथा मोठी दुर्घटना घडेल
वारंवार या दुभाजकावर वाहने आदळून अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गस्थ होताना काहीशी सावधगिरी बाळगावी लागते. डोंबिवलीच्या दिशेला जाणाºया वाहनचालकाला दुभाजक दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे. जास्तीत जास्त अपघात हे रात्रीच्या वेळेत घडले आहेत. तत्काळ संबंधित यंत्रणेने लक्ष घालावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वनजा कार्ले या दुचाकीचालक तरुणीने सांगितले.