स्लॅब पडून पोकलेन कोपर उड्डाणपुलाखाली कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:23 PM2020-05-11T21:23:44+5:302020-05-11T21:23:51+5:30
दुसरी क्रेन आणून पोकलेन उचलणार
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: येथील धोकादायक कोपर उड्डाणपूलाच्या पुर्नबांधणीला १७ एप्रिलपासून सुरुवात झाली असून त्या कामाचा एक भाग असलेल्या राजाजीपथ रस्त्यावरील अंडरपासचा स्लॅब तोडण्याचे काम पोकलेनने करण्यात येत होते. त्या कामादरम्यान स्लॅबसकट २० टन वजनाचा पोकलेन पूलाखालील राजाजी रस्त्यावर पडल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी घडली. त्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवित हानी घडली नाही.
अपघातानंतर तातडीने ड्रायव्हरला उपचारासाठी हलवण्यात आले, त्याच्या पायाला खरचटले असल्याचे सांगण्यात आले. महापालिका अधिका-यांच्या माहीतीनूसार पुष्पक रेल कॉर्पोरेशन प्रा. लि.कंपनीने हे काम हाती घेतले असून महाापलिकेचे शहर अभियंता, प्रकल्प अभियंता, सह अभियंता यांच्या देखरेखीखाली ते काम सुरु आहे. महापालिका अभियंत्यांच्या माहितीनूसार ते काम १९८० च्या दशकातील पूर्वापार केलेले असून ते बीम होते ते वेगवेगळे होेते. त्यामुळे पोकलेन त्यावर उभा राहुन काम होत असतांना स्लॅब तुटला, स्लॅबने बीम देखिल सोडले आणि ते राजाजीपथ रस्त्यावर खाली कोसळले. अशा पद्धतीने पूर्वी काम झाले असेल याची कल्पनाही नसल्याने ते एवढी वर्षे कसे टिकले याबद्दल अधिकारी वर्गामध्ये आश्वर्य व्यक्त करण्यात येत होते.
अखेरीस संध्याकाळी एका अन्य क्रेनच्या सहाय्याने खाली पडलेली पोकलेन उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, संध्याकाळी 7नंतर क्रेनच्या सहाय्याने, पडलेल्या पोकलेन उचलणे, बाहेर काढण्याचे प्रयत्न सूरु करण्यात आले होते. परंतु रात्री 9 पर्यन्त ते काम होण्यात अडथळे येत होते. पोकलेनचे फारसे नुकसान झाले नसून ती सुरक्षित आहे, फक्त सरळ करून उचलावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुढील टप्प्यात राजीजी पथ रस्त्यावर कोसळलेला मलबा उचलण्यात येणार असून अंडरपासचा अन्य दुसरा स्लॅब कशा पद्धतीने सुरक्षितरीत्या काढायचा त्याचे नियोजन करण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी आमदार रवींद्र चव्हाण, स्थानिक नगरसेवक मंदार हळबे, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश अहेर, वाहतूक पोलीस निरिक्षक सतेज जाधव, महापालिकेचे सह अभियंता शैलेश मळेकर यांच्यासह अधिका-यांनी भेट दिली होती. सहाय्यता करायला येणा-या क्रेनचे वजन देखिल २० टन असून पडलेली पोकलेन २० टनांची आहे, ती काढतांना सध्याचा पूलावरील अॅप्रोच रस्ता चांगला आहे की नाही, अन्यथा तो खचायचा. त्यामुळे त्याच्या क्षमतेची एकदा पाहणी करून मग निर्णय घ्यावा असे चव्हाण यांनी कंत्राटदाराच्या कर्मचा-याशी बोलतांन सांगितले.
* दरम्यान, या पूलावरून पश्चिमेला सुमारे ५० हजार ग्राहकांना वीज पुरवठा करणारी महावितरणची उच्च दाब वाहिनी जाते, त्या वाहिनीला काही झाले नाही ना याची पाहणी करणे, आणि ती सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असल्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी दिल्या. त्या वाहिनीला काही इजा झाल्यास शॉर्टसर्किट होऊ शकते, मोठा अपघात होऊ शकतो. तसेच पश्चिमेकडील ग्राहकांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे भूमिगत केबल टाकण्याचे काम जलद गतीने आणि दर्जेदार करण्यात यावे अशाही सूचना त्यांनी दिल्या.