औष्णिक केंद्रातील राख नेणाऱ्या डंपरचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:09 PM2019-11-19T23:09:52+5:302019-11-19T23:09:56+5:30
स्थानिक संतप्त; वाहनातून पडलेल्या राखेने पर्यावरणाची हानी होण्याची भीती
डहाणू/बोर्डी : येथील अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रातून निर्माण होणाºया राखेची डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्गावरून डंपरद्वारे गुजरातला वाहतूक केली जाते. अशाच एका डंपरचा सोमवारी रात्री अपघात झाला.
ओव्हरलोड झालेला हा डंपर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास चिखले पोलीसचौकी समोर अपघातग्रस्त होऊन त्यातील राख जमिनीवर पसरली होती. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर घोलवड पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पहाटेपर्यंत जेसीबीद्वारे राख भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या बाबत कलम १८४ अन्वये बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिकारी प्रकाश सोनावणे यांनी दिली. याबाबत अदाणी डहाणू औष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
अदाणी डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हे देशातील महत्त्वाचे ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. येथे निर्माण होणाºया राखेची गुजरातच्या दिशेने वाहतूक केली जाते. प्रतिदिन राख घेऊन जाणाºया अनेक वाहनांतून नगर परिषद क्षेत्रातील डहाणू शहर, तारपा चौक, बस आगार, मासोली, पारनाका, आगर तर ग्रामीण भागातील नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी आणि झाई या गावांमध्ये राख पडलेली दिसते. हा परिसर समुद्रकिनाºयालगत असल्याने रस्त्यावर पसरलेली ही राख भरती काळात जोराचे वारे वाहू लागल्यावर हवेत मिसळते. त्यामुळे श्वसनाद्वारे ती डोळे तसेच नाका-तोंडात जाऊन जळजळ, खोकला आदीचा त्रास होऊ शकतो. अनेकदा राखेने भरलेले वाहन रस्त्यावरून जाताना गतिरोधक वा खड्ड्यातून गेल्यास त्यातून राख बाहेर येऊन त्याच्या कणांमुळे चालकाला त्रास होतो.
डहाणू ते झाई या दरम्यान ठराविक अंतरावर हे राखेने भरलेले डंपर थांबविलेले असतात. त्यामुळे स्थानिकांकडून अपघाताची भीती व्यक्त होते. तर ही राख पडून परिसरात पसरत असल्याने पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे.