ठाण्यात ‘अपघातमुक्त दहीहंडी’ उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:34 AM2017-08-08T06:34:21+5:302017-08-08T06:34:21+5:30
हीहंडीच्या उंचीपासून अनेक निर्बंधांचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने उंचीवरील गेली दोन वर्षे असलेली बंधने शिथील होणार असल्याने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दहीहंडीच्या उंचीपासून अनेक निर्बंधांचे निर्णय राज्य सरकारने घ्यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने उंचीवरील गेली दोन वर्षे असलेली बंधने शिथील होणार असल्याने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र थरांचा थरार अनुभवतानाच यंदाची दहीहंडी ही अपघातमुक्त असेल, असा निर्धार पथकांनी बोलून दाखवला. दहीहंडीवर न्यायालयाकडून घालण्यात आलेले वय आणि उंचीचे निर्बंध जाचक वाटू लागल्याने काही गोविंदा पथकांनी राज्य शासनाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. आता सोमवारी उच्च न्यायालयाने उंची व गोविंदांच्या वयाबाबतचे निर्बंध राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनात निश्चित करावेत, असे आदेश दिल्याने सरकार दिलासा देईल व गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त उंचीचे थर लावता येतील, अशी आशा निर्माण झाल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले.
सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार १४ वर्षाखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही. याशिवाय दहीहंडीची उंची किती असावी याचा निर्णयही सरकार आणि विधिमंडळाने घ्यावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे ठाण्यातील गोविंदा पथकांनी जल्लोषात स्वागत केले. निर्णय गोविंदा पथकांच्या बाजूने लागेल अशी सुरूवातीपासूनच आशा होती असे त्यांनी सांगितले. उंचीवरचे निर्बंध हायकोर्टाने उठवले असले तरी नऊ थरांचे मनोरे रचण्याऐवजी जितका सराव झाला तितकेच थर रचू असे काही गोविंदा पथकांनी सांगितले. दोन मुख्य अटींच्या संदर्भात हायकोर्टाने सकारात्मक निर्णय दिला आहे. हा निर्णय आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. दोन वर्षे दिलेला लढा अखेर यशस्वी झाला. त्यामुळे यावर्षी त्याच उत्साहात दहीहंडी साजरी करणार असे ‘महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समिती’चे सचिव समीर पेंढारे यांनी सांगितले. जितका सराव झाला आणि जितकी क्षमता तितकेच थर लावा, अपघात होणार नाही याची काळजी घ्या. यंदा अपघातमुक्त उत्सव साजरा करु असे आवाहन तमाम गोविंदा पथकांना समन्वय समितीने केले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही सर्व गोविंदा खूष आहोत. आधीपासूनच वाटत होते की निकाल आमच्या बाजूने लागेल. आम्ही सराव सुरू केला नव्हता पण आजपासून जोशात सराव करणार. सात थर तरी यंदा नक्कीच रचणार.
- राकेश यादव, ठाण्याचा राजा गोविंदा पथक
आम्ही गुरूपौर्णिमेपासून सराव सुरू केला. या निर्णयामुळे खूप आनंद झाला. सरावाचा वेग आणखीन वाढवणार. यंदा सात थर नक्की लावू.
- निलेश वैती, जतन गोविंदा उत्सव पथक
हा निर्णय आनंद देणारा असला तरी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केल्यास महिला गोविंदा उत्साहात स्पर्धेत उतरतील. सहा ते सात थर लावण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- महेंद्र नाईक, प्रशिक्षक, संकल्प महिला गोविंदा पथक
आम्ही हा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करणार, कोणताही धांगडधिंगा नसेल. गेल्यावर्षी उत्सवाबाबत जी आमची भूमिका होती तीच यावर्षीही असेल. यंदा आमच्या इथे नऊ थर लागणार. गोविंदांच्या सर्व सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. आमच्या उत्सवाची सुरूवात ही झेंडावंदनाने करणार.
- अविनाश जाधव, आयोजक, मनसे ठाणे शहर दहीहंडी