मोबाइल अॅप लावणार अपघातांना ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:48+5:302021-07-07T04:49:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटेग्रेटेड रोड अॅक्सिडेंट डेटाबेस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटेग्रेटेड रोड अॅक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला आहे. ठाण्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून अपघातासंबंधी इत्यंभूत माहिती गोळा केली जाणार असून आयआयटी चेन्नईद्वारे त्याचे विश्लेषण होणार आहे. ठाण्यातील १०० पोलिसांना त्यासाठी विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
दिवसेंदिवस प्रशस्त रुंद रस्त्यांवरून जाणाऱ्या अत्याधुनिक वाहनांचा वेगही वाढला आहे. वाढत्या वेगामुळे तसेच बेदरकार चालकांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात २०१९ मध्ये ८७४ अपघातांमध्ये २१७ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले, तर ७९४ प्रवासी जखमी झाले. २०२० मध्ये ६६८ अपघातांध्ये ६१२ जण जखमी, तर १९२ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत ३२८ अपघातांमध्ये ८४ जणांचा मृत्यू, तर २८४ जखमी झाले आहेत. आता असे अपघात रोखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीच आयआरएडी या अॅपची निर्मिती केली आहे.
..................................
* जिल्ह्यातील रस्ते अपघात...
वर्ष अपघात जखमी मृत्यू
२०१९ ८७४ ७९४ २१७
२०२० ६६८ ६१२ १९२
२०२१ (जूनपर्यंत) ३२८ २८४ ८४
..............
१०० पोलिसांना प्रशिक्षण
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी केंद्र शासनाच्या महामार्ग मंत्रालयाने ३ ते १७ मे २०२१ या कालावधीत ३५ पोलीस ठाण्यांमधील १०० पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण दिले आहे.
* आतापर्यंत ९५ अपघातांची नोंद -
आयआरएडी या अॅपमध्ये २१ जानेवारी ते २१ मे २०२१ या कालावधीमध्ये ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडलांमधील ३५ पोलीस ठाण्यांमधून ९५ अपघातांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अॅपद्वारे असे चालणार काम...
एखादा अपघात घडल्यानंतर त्याचे फोटो, घटनास्थळ, अपघातातील वाहनांची संख्या, स्थिती, अपघातामधील व्यक्तींची संख्या, मृत तसेच जखमींची संख्या, त्याचबरोबर यामध्ये वाहनाचे झालेले नुकसान, वातावरणाची स्थिती (अंधार, धुके आणि पाऊस आदी) सविस्तर माहितीची नोंद या अॅपमध्ये पोलिसांकडून केली जाणार आहे. या अॅपमध्ये नोंद केल्यानंतरची माहिती प्रादेशिक परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठविण्यात येणार असल्याचे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रादेशिक विभागाचे काम-
आयआरएडी अॅपमध्ये नोंद केलेली माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित वाहनांची तपासणी होईल. त्यानंतर त्या वाहनांवर योग्य ती कारवाई करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तयार केला जाईल. उदा. ब्रेक, इंजिन, साईड मिरर किंवा हेडलाईट नसणे आदींच्या माहितीचा यात समावेश असेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
..........
आरोग्यविषयक सुविधा - घटनास्थळी कोणत्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत्या. (उदा. प्रथमोपचार) आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसल्यास त्या किती कालावधीत दिल्या गेल्या, त्या पुरविण्यास विलंब होण्याचे कारण, तसेच तातडीने यास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील आणि त्यास किती कालावधी लागेल, याचाही अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात येईल.
.....
सार्वजनिक बांधकाम विभाग - घटनास्थळाचे परीक्षण करून अपघात होण्याचे कारण - उदा. रस्ता वाहतुकीस योग्य आहे किंवा नाही, धोकादायक वळण, उतार अथवा चढण, खड्डे इत्यादीबाबत सविस्तर अहवाल तयार करून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.