काँग्रेस नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 07:07 AM2017-08-15T07:07:23+5:302017-08-15T07:08:19+5:30

काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर यांचा औरंगाबाद येथील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Accidental death of Congress leader Balkrishna Purankar | काँग्रेस नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांचा अपघाती मृत्यू

काँग्रेस नेते बाळकृष्ण पूर्णेकर यांचा अपघाती मृत्यू

Next

ठाणे, दि. 15 - ठाणे काँग्रेसचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले, समाजकारणासह राजकारणही तितकीच्या ताकदीने पेलणा-या आणि एक लढवय्या म्हणून ख्याती असलेल्या काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर यांचा औरंगाबाद येथील गंगापूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने एका लढवय्याचा अंत झाल्याची भावना ठाणे काँग्रेससह इतर पक्षातील मंडळींनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि ठाणे काँग्रेस पोरकी झाली. रात्री 1.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळकृष्ण पूर्णेकर यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून म्हणजेच विद्यार्थी दशेपासूनच शिक्षण, वडिलांचा रेतीचा व्यवसाय आणि वडिलांबरोबर समाजकारण करीत असतानाच त्यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला. शिक्षणाबरोबर क्रिकेट, खो-खो, व्हॉलिबॉल, कबड्डी आणि धावणे हे त्यांचे आवडते खेळ होते. धावण्याच्या 100 मीटर, 200 मीटर आदी स्पर्धांमध्ये शालेय जीवनात त्यांनी एक वेगळी छाप पाडली होती. वडिलांनी त्यांना स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पायाशी टाकले आणि येथूनच त्यांचा राजकारणाचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले. अंगात असलेली धमक, तसेच काहीही करण्याची असलेली मानसिकता, धडाडीपणा यामुळेच त्यांना विद्यार्थीदशेतच सेनेचे विभाग अध्यक्षपद मिळाले. शिवाय पक्षानेदेखील त्यांच्यावर विश्वास टाकून कॉलेजप्रमुख, उपशहरप्रमुख, जिल्हा उपप्रमुख, त्यानंतर प्रमुखपदही सोपविले होते. या माध्यमातून जिल्ह्यातील लोकांशी त्यांचा संपर्क वाढला. त्यांचाशी जवळीक वाढली. 1992च्या निवडणुकीत त्यांनी प्रभागातून निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आणि वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे, असा दृढनिश्चिय त्यांनी केला. परंतु पक्षाने त्यांचे तिकीट कापले आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. छगन भुजबळ यांच्या महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा 1997च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर आपले नशीब आजमावले आणि नगरसेवक पदही मिळविले. तसेच 2003 मध्ये राज्य शासनाने रेतीची विक्री लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित केले. परंतु यामुळे आगरी बांधवांचा उदरनिर्वाह सुरू होता, त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. त्यामुळेच त्यांनी याच्या विरोधात लढा सुरू केला. लिलाव पद्धत बंद करून त्यांनी सर्वाना दिलासा देण्याचे काम केले. त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे काँग्रेसला शहर पातळीवर बळकटी मिळाली. म्हणूनच 2005 मध्ये त्यांच्यावर सोनिया गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशने विश्वास टाकून जिल्हा काँग्रेसची जबाबदारी टाकली. त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून कार्य करताना अनेक चढ-उतार पाहिले. दरम्यान 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य निवडीच्या मुद्द्यावरून पक्षात वादळ उठले आणि त्यांना शहर अध्यक्ष पदावरुन पाय उतार व्हावे लागले. एवढ्या राहाटगाड्यातून पूर्णेकर यांनी समाजकार्यदेखील सुरूच ठेवले. आपण सारे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केले आहे, त्याकडे पाहिल्यास आपल्याला त्यांच्या समाजकार्याची जाण होऊ शकते. या संस्थेच्या माध्यमातून आरती गायन स्पर्धा, महानगरपालिका अर्थसंकल्पावर महाचर्चा, उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कार सोहळा आदींच्या माध्यमातून त्यांनी एक महत्त्वाचे कार्यदेखील केले. विशेष म्हणजे मागील सात वर्षे क्रांती दौडच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना त्यांनी एक उत्तम व्यासपीठ देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. रक्तदान करणोही त्यांना आवडत होते. आंदोलन कसे करायचे हे शिकायचे असेल तर त्यांच्याकडून शिकावे, असेही बोलले जायचे. एकूणच पक्षासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून सतत झटत राहण्याची त्यांच्यात किमया होती. परंतु आज त्यांच्या अशा जाण्याने संपूर्ण शहर काँग्रेस पोरकी झाली आहे. प्रदेश पातळीवर असताना देखील त्यांचे स्थानिक पातळीवर बारीक सारीक लक्ष असायचे. एखाद्या कार्यकर्त्यानं उद्धट वर्तन केले तरी देखील ते कधीच उलट बोलत नव्हते. उलट पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नेहमीच त्यांची भूमिका महत्त्वाची होती. 

Web Title: Accidental death of Congress leader Balkrishna Purankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.