मनोधैर्य वाढवण्यासाठी शास्त्रीय संगीताची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:25 AM2020-04-29T02:25:40+5:302020-04-29T02:26:02+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचाराबरोबर कोरोना रु ग्णांचे मनोधैर्य वाढण्यासाठी शास्त्रीय संगीताचा उपयोग केला जात आहे.
पंकज रोडेकर
ठाणे : रुग्णांचे मानसिक संतुलन राखण्याबरोबर त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी संगीताचाही उपयोग होतो, असे सांगितले जाते. यामुळे कोविड-१९ चे विशेष रुग्णालय असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचाराबरोबर कोरोना रु ग्णांचे मनोधैर्य वाढण्यासाठी शास्त्रीय संगीताचा उपयोग केला जात आहे. यासाठी वॉर्डमध्ये सेंट्रल साउंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे. दिवसभर त्या वॉर्डात शास्त्रीय संगीतातील विविध राग रुग्णांना ऐकवले जात असून प्रत्येक वॉर्डात टीव्हीचीही व्यवस्था केली आहे. येथे बातम्या वगळता मनोरंजन होईल, असे विनोदी हिंदी- मराठी कार्यक्र म दाखिवण्यात येतात. त्याचबरोबर सर्वधर्म समभाव राखण्यावर विशेष भर दिला जात आहे. हम होंगे कामयाबसह प्रवचनकार वामनराव पै यांची हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे...चांगले आरोग्य दे... ही विश्वप्रार्थना ऐकवली जात आहे. या वॉर्डच्या आत-बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही वॉच ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाबाधितांना ज्या कक्षात ठेवले जाते, तेथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही. त्यामुळे रु ग्णांना नातेवाईक, घरातील मंडळींना भेटता येत नाही. रुग्णास कोणाला भेटण्यासाठी परवानगी नसल्याने त्यांच्यात एकाकीची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन व मनोधैर्य राखण्यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात डॉक्टरांमार्फत हम होंगे कामयाब... यासारखे समूहगीत गाऊन टाळ्याही वाजवण्यात येतात; परंतु डॉक्टरांनी परिधान केलेल्या किटमुळे त्यांना मोठ्या आवाजात बोलणे शक्य होत नाही. त्यातूनच मानसिक संतुलन राखण्यात व त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी संगीताचा उपयोग होतो.
>विविध वाद्य
रागांवर विशेष भर
रु ग्णांचे मानसिक संतुलन व मनोधैर्य राखण्यात शास्त्रीय संगीताचा उपयोग होतो, असे म्हटले जात आहे. यातूनच एकदम सौम्य आवाजात शास्त्रीय संगीतातील विविध वाद्यांचे राग रुग्णांना ऐकवण्यात येत आहे. हे दिवसभर संगीत लावण्यात येणार असून रात्रीच्या वेळेस ते बंद ठेवले जाते. त्याचबरोबर, रु ग्णालयातील वॉर्डांत एकाच वेळी सूचना देण्यासही सिस्टीम उपयोगी पडत आहे.
सुरुवातीला रु ग्णांचे मनोधैर्य आणि संतुलन राखण्यासाठी हम होंगे कामयाब हे समूहगीत तोंडाने बोलले जात होते. मात्र, सेन्ट्रल साउंड सिस्टीममुळे शास्त्रीय संगीतावर विशेष भर दिले जात असून विविध वाद्यांचे राग त्याद्वारे आता वाजवले जातात. तसेच टीव्हीवर हिंदी-मराठीतील विनोदी कार्यक्र म प्रसारित केले जात असून तशी व्यवस्थाच केबलधारकाकडून करून घेतली आहे.
- डॉ. प्रसाद भंडारी, ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालय.
>जिल्हा सामान्य रु ग्णालयात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सुरु वातीला डॉक्टरांमार्फत हम होंगे कामयाब... यासारखे समूहगीत बोलून रु ग्णांचे मनोधैर्य राखले जात आहे. तर रु ग्णालयात सेंट्रल साउंड सिस्टीमची व्यवस्था असल्याने रु ग्णांचे मानसिक संतुलन राखण्याबरोबर व त्यांचे मनोधैर्य वाढण्यात संगीताचा उपयोग करणे सुरू केले आहे. त्याचा रु ग्णांना निश्चित फायदा होईल.तसेच त्यांचे मनही संगीतामुळे प्रसन्न होईल.
- डॉ . कैलाश पवार, जिल्हा. शल्यचिकित्सक, ठाणे.