दरोड्याच्या तयारीसाठी आरोपींच्या बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:18 AM2017-08-02T02:18:47+5:302017-08-02T02:18:47+5:30
बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आठ जणांची आंतरराज्य टोळी गेल्या आठवड्यात गजाआड केल्यानंतर, पोलिसांनी या टोळीच्या आणखी दोन सदस्यांना अटक केली.
ठाणे : बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आठ जणांची आंतरराज्य टोळी गेल्या आठवड्यात गजाआड केल्यानंतर, पोलिसांनी या टोळीच्या आणखी दोन सदस्यांना अटक केली. या टोळीला दरोड्याचे साहित्य पुरवणाºया आरोपीचे नाव समोर आले असून बँक लुटण्याच्या तयारीसाठी आरोपींनी तीन वेळा गुप्त बैठका घेतल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
बँक आॅफ महाराष्ट्रच्या कासारवडवली शाखेत दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या आठ जणांच्या टोळीस अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने २२ जुलैला अटक केली होती. या टोळीतील आणखी दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून दोन्ही आरोपी नवी मुंबईतील तुर्भे येथे राहणारे आहेत. इतर आरोपींप्रमाणेच हे दोन्ही आरोपीही मूळचे झारखंडमधील आहेत. बरकत आदिल शेख आणि नाबीर लुकमान शेख ही त्यांची नावे आहेत.
शैफुद्दीन रेजाबअली शेख हा या टोळीचा सूत्रधार असून त्याने झारखंडहून येताना तिघांना सोबत आणले होते. ११ जुलै रोजी शैफुद्दीन तिघांना घेऊन कुर्ला येथे आला. आणखी चार साथीदारांची व्यवस्था झाल्यानंतर १८ जुलैला वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांची पहिली बैठक झाली. या वेळी दरोड्याचा डाव प्राथमिक पातळीवर आखण्यात आला. आरोपींनी १९ जुलैला पुन्हा त्याच ठिकाणी भेटून दरोड्याबाबत चर्चा केली. २० जुलैला बँकेची रेकी करून २२ जुलैला दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पण, अमली पदार्थविरोधी पथकास या दरोड्याची चाहूल लागल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
टोळीच्या सूत्रधारांचा एक भागीदार झारखंडमध्ये असून त्यानेच दरोड्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. घटनेच्या दिवशी बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये चार लाख ५० हजार रुपयांची रोकड होती.