दागिने हिसकावणाऱ्या ‘पिल्या’सह साथीदार अटकेत; दागिने, पिस्टल, दुचाकींसह आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By जितेंद्र कालेकर | Published: November 24, 2023 09:17 PM2023-11-24T21:17:56+5:302023-11-24T21:18:30+5:30
पिल्या याने १८ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून चार लाख २१ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि चार दुचाकी असा आठ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे : सोनसाखळी तसेच दुचाकी जबरी चोरीतील प्रथमेश ढमके उर्फ पिल्या (रा. भिवपुरी, ता. कर्जत, जिल्हा रायगड) या अट्टल चोरट्यास तसेच शस्त्र बाळगणाऱ्या सुनील गोयल (२१) अशा दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. पिल्या याने १८ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून चार लाख २१ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि चार दुचाकी असा आठ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांच्या पथकाने दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी रोजी सायंकाळी ६.३०च्या सुमारास पाचपाखाडी परिसरात सुनील रामबरन गोयल उर्फ रंभा उर्फ पप्पी (२१, रा. आंबिवली, कल्याण) याला पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि चोरीच्या बुलेट दुचाकीसह अटक केली होती. त्याच्या चौकशीतून हे पिस्टल मूळ भिवपुरीचा राहणारा आणि सध्या आंबिवली येथे राहणारा त्याचा मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्या याने दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास जळगावातून अटक केली. त्यानंतर आपणच सुनील रामबरन गोयल यास पिस्टल व जिवंत काडतुसे दिल्याची कबुली आरोपीने दिली. त्याने साथीदार सज्जो उर्फ सेहजाद मोहंमद शुदु (रा. आंबिवली, कल्याण) याच्या मदतीने ठाणे, कल्याण, उल्हासनगर आदी परिसरात ११ ठिकाणी सोनसाखळीची जबरी चोरी केल्याची तसेच इतर साथीदारांच्या मदतीने चार दुचाकी चोरी केल्याचीही त्याने कबुली दिली. तसेच चार लाख २१ हजारांचे सोन्याचे दागिनेही त्याने दिले. दाेन बुलेट दुचाकी, दुचाकी आणि एक स्कूटर अशा चार चाेऱ्यांमधील दुचाकींसह आठ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे.
गंभीर स्वरूपाचे ३५ गुन्हे
पिल्या उर्फ प्रमेश ढमके याने त्याचा साथीदार सज्जो याच्यासह ठाणे, मुंबई आणि पुण्यात दुचाकी तसेच सोनसाखळी चोरीचे ३५ गुन्हे केले आहेत. त्यातील १७ गुन्ह्यांमध्ये तो अटक झाला. जामिनावर सुटताच एप्रिल २०२३ रोजी ते २० नोव्हेंबर या काळात त्याने साथीदारांसह १८ गुन्हे केल्याचे पाेलिसांनी सांगितले.