नागरिकांची मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:37+5:302021-03-06T04:38:37+5:30
- प्रदीप इंदूलकर, दक्ष नागरिक, ठाणे ------------ ठाण्यात पायाभूत सुविधा या चांगल्या आहेत. ठाण्यात जगणे सुसज्ज असल्यानेच अनेक मराठी ...
- प्रदीप इंदूलकर, दक्ष नागरिक, ठाणे
------------
ठाण्यात पायाभूत सुविधा या चांगल्या आहेत. ठाण्यात जगणे सुसज्ज असल्यानेच अनेक मराठी कलावंत येथे वास्तव्यास आलेले आहेत. मराठी मालिकांचे चित्रीकरणही येथे होत आहे. त्यामुळे एखादा स्टुडिओ येथे तयार झाला तर त्यातून चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत; परंतु उच्चशिक्षणासाठी आजही विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे त्या संधी येथेच उपलब्ध झाल्या, तर त्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.
- दिलीप डुंबरे, शिक्षक, ठाणे
----------
पायाभूत सुविधा हव्या तशा नाहीत. त्यातही शिक्षणाच्या सुविधा आजही तुटपुंजा आहेत. उच्चशिक्षणासाठी आजही ठाण्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुण्याकडेच धाव घ्यावी लागत आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र ठाण्यात असले तरी तेथे सर्वच शिक्षणाच्या सोयी आजही उपलब्ध नाहीत. रस्ते वाढले असले तरी वाहतूककोंडीतून आजही ठाणेकरांची सुटका होऊ शकलेली नाही.
- विना सालीयन, शिक्षिका
----------
महानगराच्या पायाभूत सोयी, रस्ते, शिक्षणाच्या विशेषतः उच्चशिक्षण सुविधा वाढल्यात याबाबत शंका नाही; पण नागरिकांचे जीवनमान सुधारले का? याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण पूर्वी इतिहासात ठाणे हे व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. नंतर ते रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून वागळे इस्टेट, पोखरण रोड नंबर दोन, घोडबंदर, कोलशेत रोड तसेच बाळकूम, माजिवडा, कळवा व पुढे बेलापूर पट्टी यात लाखो रोजगार उपलब्ध होते. हे सर्व छोटे-मोठे कारखाने बंद करून त्याच जागी निवासी संकुले उभी राहिली, त्यात राहणारे ठाण्यात नोकरी व रोजगार करत नाहीत, याअर्थाने या महानगरात रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. बाहेरून विकसित दिसत असलेले महानगर जवळपास ४५० लोकवस्त्यांनी घेरलेले असून त्यात कमी उत्पन्न गटातील जनता राहत आहे. त्यांच्या श्रमावर या शहराचा गाडा सुरू आहे. या अल्प उत्पन्न गटातील असलेल्या जनतेची एकूण संख्या १०-१२ लाखांच्या पुढे आहे. यांचे जीवनमान घटलेले आहे, रोजगारही घटलेला आहे. याकडे डोळेझाक करून देशात आमचा ११ वा नंबर आला, अशी पाठ थोपटून घेण्यात आपणच आपली दिशाभूल करत राहू.
- संजीव साने, स्वराज इंडिया