मिरीटनुसार ठाणे लोकसभा भाजपाला द्या, २३ नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 02:49 PM2019-02-25T14:49:42+5:302019-02-25T14:51:45+5:30
ठाणे - एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये युती झाली असली तरी अनेक ठिकाणी या युतीच्या विरोधात आतापासूनच खटके उडू ...
ठाणे - एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये युती झाली असली तरी अनेक ठिकाणी या युतीच्या विरोधात आतापासूनच खटके उडू लागले आहेत. ठाण्यातील भाजपाच्या २३ नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून मिरीटीनुसार ही जागा भाजपाला द्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दाबे चांगलेलच दणाणले आहेत. ही जागा भाजपाला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नसल्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.
राज्यात सध्या युतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे युती धर्म पाळण्यासाठी मागील साडेचार वर्षे एकमेकांच्या विरोधात बोलणारी मंडळी आता एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु भिवंडीत तर शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराने भाजपाच्या विरोधात असहकार पुकारला आहे. त्यानंतर आता ठाणेलोकसभा मतदार संघातही शिवसेनेच्या मनात धडकी भरण्याची कामे भाजपाच्या नगरसेवकांनी केले आहे. ठाणे लोकसभेची जागा ही मिरीट नुसार भाजपालाच द्यावी अशी थेट मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे विधानसभेत नंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, संजय केळकर तर निरंजन डावखरे आणि रमेश पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. परंतु शिवसेनेचे मात्र विधानसभेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आणि रविंद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळाचा विचार केल्यास मिरीटनुसार भाजपाच आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.
दुसरीकडे मागील साडेचार वर्षात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार आणि नगरसेवकांच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच लोकांशी उध्दटपणे वागणे यामुळे ठाणेकरसुध्दा त्यांच्यावर नाराज आहेत. या संदर्भात आपल्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यातही ही जागा शिवसेनेला देणे अपरिहार्य झाले तरी सुध्दा राजन विचारे यांच्या ऐवजी दुसरे कोणतेही नाव द्यावे त्यांच्यासाठी आम्ही काम करु मात्र विचारेंचे काम करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सर्व नगरसेवकांची जी मागणी आहे, त्यानुसार हा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे श्रेष्ठी याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे.
(नारायण पवार - गटनेते, भाजपा)
श्रीकांत शिंदेच्या विरोधातही कळवा, मुंब्य्रात असहकार
युती झाली असली तरीसुध्दा मागील साडेचार वर्षात श्रीकांत शिंदे यांनी कळवा, मुंब्य्राकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही काम का करायचे असा सवाल कळवा, मुंब्य्रातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.