विधानसभा अध्यक्षांकडून निर्णयाची आम्हालाही प्रतिक्षा; सर्वोच्च सुनावणीवर बोलले श्रीकांत शिंदे
By अजित मांडके | Published: October 13, 2023 02:52 PM2023-10-13T14:52:02+5:302023-10-13T14:52:51+5:30
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ठाणे : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील. त्यांना देखील विविध प्रकारचे कागदपत्र तपासावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत आहे. मात्र, न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष हे आता लवकरच शेड्युल देतील, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. निवडणुक आयोगाने यापूर्वी खरी शिवसेना आम्ही आहोत, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही देखील आता अध्यक्षांकडून निर्णयाची वाट बघत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. यापूर्वी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे विचार देत होते. याच विचारांचे सोने लुटण्यासाठी सर्वजण एकत्र येत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यातून कॉंग्रेसला गाढण्याचे विचार दिले होते. परंतु आता हिंदुत्वाचे विचार बाजूला पडले असून, केवळ कॉंग्रेस कशी वाढेल यासाठीच प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळेच उध्दव ठाकरे हे मालमत्तेचे वारसदार आहेत. परंतु हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील दिड वर्षापासून राज्य सरकाराने सर्वच निर्बंध दूर केले आहेत, त्यामुळेच सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्या बाबत त्यांनी छेडले असता, काही लोकांवर बोलायला मला आवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नरेश म्हस्के यांनी संजय राऊत हे भंगार मनोवृत्तीचे असल्याचा पुर्नउच्चार केला. तसेच त्यांनी पक्षाला भंगारात नेण्याचे काम केले आहे. उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाºयांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोदामात भंगार बनून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
पुण्यात शिवसेनेच्या वतीने ड्रग्ज माफीयाच्या विरोधात कारवाई व्हावी या उद्देशाने मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यावर म्हस्के यांनी छेडले असता, केवळ सहानभुती मिळविण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. ज्या ड्रग्ज माफीयाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे, त्याच्या सोबत उध्दव ठाकरे यांचे फोटो आहेत, त्याला पक्षात घ्यावे म्हणून कोणी दबाव आणला होता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.