७ वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
By धीरज परब | Published: March 17, 2023 01:58 PM2023-03-17T13:58:24+5:302023-03-17T14:00:02+5:30
२०१६ साली झालेल्या हत्येतील एका आरोपीला ७ वर्षानंतर उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.
मीरारोड - मीरारोड मध्ये २०१६ साली झालेल्या हत्येतील एका आरोपीला ७ वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात गुन्हे शाखा १ च्या पथकास यश आले आहे.
मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात ९ जुलै २०१६ रोजी रईस रोशन अन्वर हुसेन याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शानु कालिया उर्फ शाहनवाज आयज अहमद, सोहेल शेख, नौशाद ऊर्फ अली इर्शाद शेख खान ह्या तिघांना अटक केली होती . तर चौथा आरोपी असद अहमद सिध्दीकी हा फरार झाला होता . पुर्वीच्या वादाचा राग मनात धरुन चौघांनी रईस याची हत्या केली होती .
हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे पथक आरोपीचा शोध घेत होते . गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराडे तपास करत होते . सिध्दीकी हा हत्या केल्या पासून उत्तर प्रदेशच्या कौसुंबी जिल्ह्याच्या परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखाला मिळाली .
कुराडे यांनी गुन्हे शाखेचे किशोर वाडीले, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, प्रशांत विसपुते यांचे पथक उत्तर प्रदेश येथे पाठवून सिध्दीकी ( वय ४१ वर्षे ) ह्याला १३ मार्च रोजी ताब्यात घेतले. आरोपीला नयानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. आरोपीला ठाणे न्यायालयाने २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .