गोळीबारप्रकरणी फिर्यादीच निघाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:35 AM2019-06-09T01:35:49+5:302019-06-09T01:35:57+5:30
संडे अँकर । भिवंडीची घटना : कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी रचला कट
भिवंडी : तालुक्यातील रांजनोलीनाका येथील स्वीट हार्ट आॅर्केस्ट्रा बारचे चालक अमोल बोराडे यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी कोनगाव पोलिसांनी इंदूर येथून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीत गोळीबाराच्या कटाचा सूत्रधार खुद्द बारचालक अमोल असून त्याने कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी केलेला कट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
२८ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास अमोल बारच्या मागील बाजूस सिगारेट ओढत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करत जखमी केले होते. याबाबत, कोनगाव पोलीस ठाण्यात अमोल याने तक्रार दिली होती. दरम्यान, इंदूर येथून तालुक्यातील कांदळी गावातील रहिवासी कपिल कथोरे व इरफान शेख यांना गावठी कट्ट्यासह अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोनगाव पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या तपासात आरोपींच्या फिर्यादीसोबत झालेल्या संभाषणातून गुन्ह्यातून फिर्यादी आरोपींना सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी अमोल याच्याकडे मोर्चा वळवला असता त्याने गोळीबाराचे नाटक रचल्याचे स्पष्ट झाले.
यू-ट्युबवरील व्हिडीओ पाहून रचले नाटक
अमोल याने आपल्या व्यवसायासाठी बऱ्याच ओळखीतील व्यक्तींकडून तीन कोटी उधार घेतले होते. काही महिन्यांपासून त्यास आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्याला वेळ मिळावा, यासाठी त्याने हा कट रचला होता.
त्याने यू-ट्युबवर एक व्हिडीओ पाहिला. त्यामध्ये उजव्या पाठीच्या वरच्या बाजूस गोळी लागल्यास व्यक्ती जखमी होऊ शकते, मात्र तिचा मृत्यू होत नाही.
हे पाहिल्यानंतर त्याने ही क्लृप्ती वापरून आपल्याच ओळखीतील कपिल व इरफान यांच्याशी चर्चा करून गोळीबार करण्याचे नाटक रचले. मात्र, हे रचलेले कुभांड पोलिसांनी उघड केले. सध्या बोºहाडे उपचार घेत आहे.