डबिंग आर्टिस्टच्या खून प्रकरणातून आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:52 AM2018-05-11T04:52:46+5:302018-05-11T04:52:46+5:30
डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या मीरा रोड येथील एका महिलेच्या खून प्रकरणातून न्यायालयाने एका चालकाची निर्दोष सुटका केली. जानेवारी २०१३मध्ये ही घटना घडली होती.
ठाणे - डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या मीरा रोड येथील एका महिलेच्या खून प्रकरणातून न्यायालयाने एका चालकाची निर्दोष सुटका केली. जानेवारी २०१३मध्ये ही घटना घडली होती.
सीमा मॅसन यांचा मृतदेह २ जानेवारी २०१३ रोजी त्यांच्या मीरा रोड येथील फ्लॅटमध्ये आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये सीमा यांच्या पतीच्या कंपनीमध्ये चालक म्हणून कामाला असलेल्या सोनू सिंग यांना अटक करण्यात आली होती. सोनू सिंग हे सीमा मॅसन यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाºया त्यांच्या बहिणीकडे वास्तव्यास होते. आरोपीचे सीमा मॅसन यांच्याशी जवळचे संबंध होते.
सीमा मॅसन यांचे पती रूपेश यांच्याकडून या संबंधांबात आक्षेपही नोंदवण्यात आला होता. घटनेच्या दिवशी सीमा प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच होत्या. रूपेश यांनी आरोपीशी संपर्क साधून पत्नीची विचारपूस करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपी सीमा यांच्या घरी गेला असता दरवाजा आतून बंद होता. बेल वाजवूनही कुणीच दरवाजा न उघडल्याने आरोपीने ही बाब रूपेश यांना फोन करून सांगितली. त्यानंतर रूपेश घरी आले. दरवाजा तोडला असता त्यांना पत्नी मृतावस्थेत आढळली.
याप्रकरणी रूपेश यांनी केलेल्या तक्रारीनुसार काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाअंती सोनू सिंग याला अटक करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सीमा मॅसन यांच्या मोबाइलच्या कॉल्सचा तपशील न्यायालयासमोर आला.
न्यायालयाने तो तपासला असता घटनेच्या जवळपास दोन महिने आधीपासून मृतक आणि आरोपी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, आरोपी या खून प्रकरणात सहभागी असल्याचा कोणताही ठोस पुरावा सरकारी पक्ष न्यायालयासमोर सादर करू शकला नाही. शिवाय इतर पुरावेही सबळ नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे केवळ संशयावरून एखाद्याला खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी ठरवता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली.