‘आरोपी दत्तक योजना’
By admin | Published: March 30, 2017 06:36 AM2017-03-30T06:36:23+5:302017-03-30T06:36:23+5:30
आपण ऐकून असाल की, बाळ दत्तक योजना. परंतु, एखाद्या गुन्हेगाराला दत्तक घेतलेले ऐकलेले नसेल. मात्र,
पंकज रोडेकर / ठाणे
आपण ऐकून असाल की, बाळ दत्तक योजना. परंतु, एखाद्या गुन्हेगाराला दत्तक घेतलेले ऐकलेले नसेल. मात्र, ठाणे शहर पोलिसांनी चक्क आरोपीच दत्तक घेतले आहेत. पोलीस आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाण्यांत आरोपी दत्तक योजनेंतर्गत एका कॉन्स्टेबलला एका आरोपीवर लक्षच नाही, तर त्याच्या प्रत्येक छोट्यामोठ्या हालचालींवर डोळ्यांत तेल टाकून नजर ठेवायची आहे. शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांची जशी टॉप-२० यादी तयार केली होती, तशी यादी दत्तक योजनेत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे शहरासह राज्यात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. याचदरम्यान, ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार परमबीर सिंग यांनी घेतल्यावर त्यांनी सोनसाखळी चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी टॉप-२० ही संकल्पना आयुक्तालय कार्यक्षेत्रात राबवण्यास सुरुवात केली. याअंतर्गत रेकॉर्डवरील सर्वच सोनसाखळी चोरट्यांची यादी तयार करून त्यांची माहिती गोळा करून तिची इतर पोलीस दलामध्ये देवाणघेवाण करण्याचे काम केले. त्यामुळे सहज या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
नुकतेच ठाणे पोलिसांनी सर्व प्रकारच्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी ‘आरोपी दत्तक योजना’ हाती घेतली आहे. ही योजना आयुक्तालयात सुरू करताना प्रत्येक पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलवर एक आरोपीवर वॉच ठेवण्याची जबाबदारी टाकली आहे. जेथे जास्त गुन्हे घडतात, त्या ठिकाणी एका कॉन्स्टेबलला दोन किंवा तीन गुन्हेगारांची जबाबदारी दिली. यामध्ये आरोपीचा फोटो, त्याचे नातेवाईक तसेच त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले असेल, तर ते ठिकाण, जेलमध्ये असेल तर त्याचे ठिकाण, अशी माहिती गोळा करताना, एखाद्या वेळी त्याला ताब्यात घ्यावयाचे असेल, तर तो कुठे मिळेल, याचीही माहिती घ्यावयाची जबाबदारी कॉन्स्टेबलवर सोपवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘‘ही योजना या वर्षी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्थानिक पातळीवरील दादांवर प्रामुख्याने वचक राहणार आहे. तसेच आपल्यावर पोलिसांची नजर असल्याने तेही भीतीच्या सावटाखाली राहतील. तसेच त्यांना पकडणेही सहज शक्य होईल.’’
- परमबीर सिंग,
पोलीस आयुक्त, ठाणे शहर