ठाण्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:55 PM2020-09-17T22:55:44+5:302020-09-17T23:10:08+5:30
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा कोपरी पोलिसांनी उस्मानाबाद येथून शोध घेतला. याप्रकरणी अनिकेत उघाडे याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही पाठपुरावा केल्याने मुलीच्या आईने जाधव यांचेही आभार व्यक्त केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोपरीतील १६ वर्षीय मुलीच्या अपहरणाची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून मिळाल्यानंतर अनिकेत उघाडे (१९) याच्या तावडीतून या मुलीची सुटका करण्यात आली आहे. त्याच्या तावडीतून मुलीची सुखरुप सुटका झाल्यानंतर मनसेचे जाधव आणि कोपरी पोलिसांचे तिच्या आईने आभार व्यक्त केले.
फेसबुकवर ओळख झाल्यानंतर या अल्पवयीन मुलीला अनिकेत याने मैत्रिचे अमिष दाखविले. त्यानंतर ठाणे पूर्वेकडील कोपरी भागातून ही मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्र ार ३० आॅगस्ट रोजी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याच तक्र ारीबाबत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला. दरम्यान वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंभाते यांच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हयातून अपहृत मुलीचा शोध घेतला. अपहरण आणि अत्याचारप्रकरणी ठाण्यातून अनिकेत या कथित आरोपीला १५ सप्टेंबर रोजी अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीची दखल घेत अविनाश जाधव यांनी कोपरी पोलिसांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त केले. पोलिसांनी तातडीने तपास करून अपहृत मुलीचा छडा लावल्यामुळे
गुरुवारी पक्ष कार्यालयात येऊन त्या महिलेनेही भावूक होत आभार व्यक्त केल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, आरोपी अनिकेत याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.