विवाह संकेत स्थळांद्वारे हेरुन तरुणीला लाखाेंचा गंडा, भामटयाला नांदेडमधून अटक
By जितेंद्र कालेकर | Published: February 29, 2024 09:55 PM2024-02-29T21:55:52+5:302024-02-29T21:56:13+5:30
ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई
ठाणे: विवाह संकेत स्थळावर उच्च शिक्षित, व्यवसायिक मुलगा शोधणाऱ्यांनी थाेडी सावधानता बाळगण्याची गरज आहे. स्वत:च्या चैनीसाठी मुलींना संकेत स्थळावर हेरून, लाखो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या भास्कर शिर्के रा. पुणे या २५ वर्षीय् भामटयाला नांदेडमधून अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
विवाहासाठी अनुरुप उपवर मुलगा शोधण्यासाठी संकेत स्थळावर अनेक मुलींचे पालक आणि उपवर मुली नाव नोंदणी करतात. अशाच संकेत स्थळावर निवडलेली काही मुले बतावणी करीत आथिर्क लुबाडणूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या एका तरुणीने लग्नासाठी विवाह संस्थेच्या एका संकेतस्थळावर अलिकडेच नाव नोंदवले होते.
मुलांची स्थळ शाेधतांना भास्कर हा पुण्यातील मुलगा तिने निवडला. एमबीए झालेल्या भास्करने आपली ट्रेडिंग कंपनी आणि बांधकाम व्यवसाय असल्याचाही दावा केला होता. बोलतांना चांगली छाप पाडणार्या भास्करने या मुलीला चांगलेच भुलवले. मोबाईलवरील संभाषणातूनच त्याने व्यवसायासाठी ४० हजारांची रक्कम मुलीकडे मागितली.
आपला विवाह याच्याशीच होणार असल्याने विश्वासाने तिने त्याला आॅनलाईन पैसे दिले. जानेवारी महिन्यात ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याकडून वेगवेगळी कारणे सांगत त्याने तिच्याकडे पाच हजारांपासून ते ५० हजारांपर्यंतची रकम मागितली. तिनेही ताे भावी जीवनसाथी हाेणार असल्याने त्याला तब्बल ११ लाख रुपये दिले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी २६ फेब्रुवारी २०२४ राेजी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला पाेलिस उपनिरीक्षक ज्याेतीराम भाेसले यांच्या पथकाने
नांदेडमधून २७ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली. सर्व बँक डिटेल, त्याच बरोबर मोबाईल लोकेशन तपासून मोठ्या कौशल्याने त्याला अटक केली. मौजमजेसाठी हे सर्व पैसे उधळल्याचे त्याने चाैकशीमध्ये पाेलिसांना सांगितले. आणखी काही तरुणींना त्याने गंडा घातल्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे.
विवाह संकेतस्थळावर नाव नोंदवताना मुलगा किंवा मुलीची संपूर्ण माहिती घेऊन पुढील प्रक्रिया करावी. भूलथापांना बळी न पडता. मुला मुलींची कौटुंबिक माहिती, पार्श्वभूमी याची सखोल माहिती मिळाल्यानंतर स्वत: किंवा नातेवाईक मित्रपरिवाराच्या मार्फतीने समक्ष भेट घेणेही आवश्यक आहे.
शिवाजी गवारे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट पाेलिस ठाणे.